कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य-कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल…


कापूस सुधार प्रकल्पामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पाने तयार केलेली कापूस पीक लागवडीची पंचसूत्री कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. यामध्ये योग्य वाणाची निवड, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार लागवडीचे अंतर, संतुलित खतांचा वापर, योग्य पाणी व्यवस्थापन आणि शास्त्रीय वाढ नियंत्रण या बाबींचा समावेश आहे. या सर्व बाबींचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ साध्य करता येते असे प्रतिपादन कापूस सुधार प्रकल्पाचे प्रमुख व कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पांमध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक, कापूस पिक चर्चा सत्र व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. पवन कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. पवन कुलवाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. व्ही. एस. पाटील यांनी कापूस पिकातील संतुलित खत व्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीसह जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते असे त्यांनी यावेळी सांगितले. कापूस प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच जैविक निविष्ठांचा वापर, सहाय्यक कृषीविद्यावेता डॉ. नवनाथ मेढे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व तण नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे श्री. प्रकाश धोंडे तसेच प्रगतशील शेतकरी श्री. राजू येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुईमूग पैदासकार डॉ. अधीर आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. शिल्पा गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी श्री. अशोक गिरगुणे तसेच श्री. राम मिसाळ, कापूस सुधार प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य तसेच सडे, पिंपरी अवघड, गोटुंबे आखाडा, वरवंडी, येवले आखाडा, वराळे वस्ती आणि राहुरी परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
