Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठात उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळा संपन्न…

कृषि उद्योजकता फोरम हा विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी आशादायक उपक्रम:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ ):-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला कृषि उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 15 महाविद्यालयांच्या मार्फत हा फोरम कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात प्रवेश होणार्या दीक्षारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा भविष्यातील करिअर करण्याच्या दृष्टीने कल पाहून त्यानुसार या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा कृषि उद्योजकता फोरम हा विद्यापीठाचा आशादायक प्रकल्प असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीनप्लास्ट टेक इंडिया प्रा. लि., बेंगळुरूचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. राजीब कुमार रॉय तसेच सह्याद्री फार्म्स, नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सह्याद्री फार्म्सच्या एच. स्क्वेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले, सह्याद्री फार्म्सच्या इनक्युबेशन सेंटरचे प्रमुख संदीप शिंदे, कृषिविद्या विभागाचे प्रमुख मंगेश भास्कर व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते.
यावेळी उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीमधील संधी या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. राजीब कुमार रॉय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शेती क्षेत्रात उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी खूप आव्हाने आहेत. हि वेळ तुमची आहे आणि या वेळेचा सदउपयोग केला तर भविष्य तुमचे आहे. कृषि उद्योजकतेमध्ये फार संधी आहेत. तुम्ही जर मनापासून प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळेल परंतु त्यासाठी प्रयत्न कधीही सोडू नका. उद्योजक बनण्यासाठी ज्या सर्व गोष्टींची गरज आहे त्यामध्ये स्वतःला सतत अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. काटेकोर शेती, सेन्सर्स आधारित शेती, ड्रोन तंत्रज्ञान, मोबाईल फोनचा डॉक्टर म्हणून वापर, शीतगृहांची साखळी तसेच मूल्यवर्धन व बाजार संबंध हे घटक उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेमध्ये महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. श्री. विलास शिंदे उद्योजकतेची शेतीमधील गरज या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की भारतात शेतीचे उत्पन्न कमी आहे याचे मुख्य कारण मूल्यवर्धनाचा अभाव हे आहे. चीन व नेदरलँड्सच्या तुलनेत भारतात व्हॅल्यू चेन, प्रक्रिया उद्योग व ब्रँडिंग यामध्ये सुधारणा करण्यात मोठा वाव आहे. विकसित भारत 2047 साठी शेतकरी-आधारित मजबूत व्हॅल्यू चेन उभारणी हा महत्त्वाचा रोडमॅप म्हणून समोर येत आहे. युवकांनी कृषि उद्योजक बनून नवकल्पना, तंत्रज्ञान व मूल्यवर्धनाद्वारे शेतीला नवे स्वरूप देण्याची गरज आहे. एकूणच, नवकल्पना, उद्योजकता व मजबूत व्हॅल्यू चेन यांच्या आधारेच कृषि क्षेत्राचा शाश्वत व समृद्ध विकास शक्य आहे.
कार्यशाळेमध्ये संदीप शिंदे, प्रमोद राजेभोसले व मंगेश भास्कर यांनी उच्च तंत्रज्ञान शेतीतील संधी, शेतीमधील उद्योजकतेची गरज, स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सहाय्य व्यवस्था तसेच कृषि पदवीधरांसाठी ग्रोथ माइंडसेट व विद्यार्थ्यांनी आपली भविष्यातील भूमिका ठरविण्याच्या दृष्टीने करावयाची योग्य गोष्टीची निवड यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. सचिन नलावडे यांनी मानले. या कार्यशाळेचे संयोजक म्हणून कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. नलावडे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांनी काम पाहिले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. विक्रम कड, डॉ. सुनील कदम, डॉ. नितीन दानवले आणि डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी काम पाहिले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, 15 महाविद्यालयांच्या विद्यार्थी फोरमचे समन्वयक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालयातील 1500 च्या वर विद्यार्थी व प्राध्यापक या कार्यशाळेत ऑनलाईन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *