राहुरीत मिशन वात्सल्य समितीची सभा संपन्न; एकल महिला व बालकांसाठी 7 महत्त्वाचे निर्णय…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट आदेशानंतर राहुरी तालुक्यात आज मिशन वात्सल्य समितीची सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सलग तीन महिने सभा न झाल्याच्या तक्रारीनंतर ही सभा घेण्यात आली असून, यात एकल महिला आणि एकल बालकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात आले.
सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात झालेल्या या सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले यांच्यासह साऊ एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस उपस्थित होते.
तक्रारीनंतर सभा, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मिशन वात्सल्य समितीची सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र राहुरीत सलग तीन महिने सभा न झाल्याने समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस यांनी महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांना उर्मट वागणूक मिळाल्याचा आरोप करत ढूस यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची तात्काळ दखल घेत राज्यातील सर्व तहसीलदारांना नियमित सभा घेण्याचे आदेश दिले. त्याच आदेशाच्या अनुषंगाने आजची सभा महत्वाची ठरली.
सभेत झालेले 7 महत्त्वाचे निर्णय
- गावनिहाय गणना : तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- एकल बालकांचा शोध : तालुक्यातील सर्व एकल बालकांची गणना करून बाल संगोपन योजनेपासून वंचित असलेल्या बालकांचा शोध मोहीम राबवली जाणार आहे.
- प्राधान्य : एकल महिलांच्या विविध प्रश्नांना सर्व शासकीय विभागांमध्ये प्राधान्यक्रम दिला जाईल.
- निराधार योजनेचा लाभ : संजय गांधी निराधार योजनेचा जास्तीत जास्त एकल महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- वैद्यकीय सवलत : एकल महिलांना वैद्यकीय बिलात सवलत मिळावी यासाठी तालुक्यातील सर्व दवाखान्यांना विनंती करण्यात येणार आहे.
- डॉक्टरांचा सन्मान : जे डॉक्टर एकल महिलांना मोफत वैद्यकीय सेवा देतात त्यांचा समितीच्या सभेत सन्मान केला जाणार आहे.
- मालमत्ता हक्क : एकल महिलांना वारसा हक्काने मिळणाऱ्या किंवा मिळालेल्या मालमत्तेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाणार आहे.
सभेच्या शेवटी अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस यांनी तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी तातडीने सभा घेऊन निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले.
मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला आणि बालकांना न्याय व सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने घेतलेले हे निर्णय तालुक्यातील हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.
