
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोळपेवाडी वार्ताहर :- रब्बी हंगामात नुकसान झाले तर खरीप हंगामात भरून निघेल, ह्या पिकात नाही परवडले तर पुढच्या पिकात नक्की परवडेल या भाबड्या आशेवर शेतकरी शेती व्यवसाय करीत असतांना निसर्ग तर शेतकऱ्यांची परीक्षा पाहतच आहे. मात्र काही बियाणांच्या कंपन्या देखील शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत आहे. अशा फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. दत्तात्रयजी भरणे यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील टरबूज लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी ज्या कंपनीकडून टरबूज रोपे घेतली होती त्या कंपन्या देखील अंगाला कासरा लागू देत नव्हत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रयजी भरणे यांच्याकडे या शेतकऱ्यांची कैफियत मांडून नुकसान भरपाई मिळावी याबाबत निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी चालूवर्षी विविध नर्सरीमधून सिजेंटा व सिंबा कंपनीचे टरबूज रोपे घेवून आपल्या शेतात टरबूज लावले होते. परंतु या कंपन्यांची टरबूज रोपे अतिशय निकृष्ठ दर्जाची असल्यामुळे या वाणांना रोगराई अजिबात सहन होत नव्हती. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे कित्येक एकर टरबूज शेती रोगराईला बळी पडून या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली असता तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यावेळी सिजेंटा व सिंबा कंपनीचे टरबूज रोपे लावणाऱ्या सुमारे २५ एकर क्षेत्रावरील शेतकऱ्यांचे १००% नुकसान झाल्याचा अहवाल दिला असून सिजेंटा व सिंबा कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी अगोदरच अडचणीत असतांना शेतकऱ्यांना निकृष्ठ दर्जाची टरबूज रोपे देवून सिजेंटा व सिंबा कंपनीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करून अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी अजून वाढविल्या आहेत.त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दर्जाची टरबूज रोपे देवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सिजेंटा व सिंबा कंपनीवर कडक करावी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत आपण स्वत: जातीने लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही कृषी मंत्री ना. दत्तात्रयजी भरणे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे. झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी आमचे गाऱ्हाणे थेट कृषी मंत्र्यांपुढे मांडल्यामुळे यावर नक्कीच सकारात्मक कार्यवाही होणार असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
