
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अधिनियम ६१ मधील कलम १०१ अन्वये थकबाकी वसुलीसाठी वसुली दाखला देण्याचे अधिकार प्राप्त झाले असून वसुली दाखला देण्यासाठी राज्य फेडरेशनचे अस्थापनेवर परसेवा अधिकारी म्हणुन श्री.प्रदीप कारभारी सानप या सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देतांना श्री.कोयटे म्हणाले कि,‘महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचा थकबाकी वसुलीचा कायदा गतिमान होण्यासाठी गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. दाखला देण्याचे प्रक्रीयेसाठी ६ महिने ते १ वर्ष कालावधी लागत होता. हा कालावधी आता राज्य फेडरेशनच्या प्रयत्नाने कमी होणार असून केवळ ३० दिवस ते जास्तीत जास्त ६० दिवस या कालावधीत हा दाखला आता देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सौ. सुरेखा लवांडे यांनी दिली.’
श्री प्रदीप कारभारी सानप हे गत २५ वर्षे सहकार खात्यात विविध पदांवर काम केलेले अधिकारी आहेत. श्री.सानप साहेब प्रत्येक सोमवारी अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधीच्या साक्षी चेंबर, कोर्ट गल्ली अहमदनगर येथील कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था नाशिक याठिकाणी उपलब्ध असणार आहे.
कामाच्या व्याप्तीप्रमाणे अहमदनगर व नाशिक येथे आणखी २ ते ३ दिवस कालावधी वाढविण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी हे अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सीटीसी क्र.११९ / बी, तिसरा मजला प्रमिला अपार्टमेंट, लकाकी बंगलो शेजारी, लकाकी रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथील ऑफिस मध्ये इतर दिवशी उपलब्ध असणार आहे. अर्थात महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील सहकारी पतसंस्थांना या सेवाचा लाभ घेता येणार आहे.
श्री.प्रदीप कारभारी सानप यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र मिळाले असल्याने,तसेच हि सेवा ऑनलाइन देखील उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांना या सेवेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
