
कोपरगाव प्रतिनिधी:-
“स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सोय नसल्याकारणाने तत्कालीन शेतकरी अज्ञान, अंधश्रद्धा व रुढी परंपरेच्या गाळात रुतलेला होता, अशा काळात डॉ. पंजाबराव देशमुखांसारख्या विदर्भातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या भूमिपुत्राने केलेल्या क्रांतिकारी कार्यामुळे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले व देश कृषी क्षेत्रात मोठी प्रगती करू शकला”, असे प्रतिपादन प्रा. विशाल नंदागवळी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगिकता’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान सत्रात प्रा. नंदागवळी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
प्रा नंदा गवळी पुढे म्हणाले की डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अत्यंत विषम परिस्थितीत प्रचंड संघर्ष करून परदेशात जाऊन मोठमोठ्या पदव्या प्राप्त संपादित केल्या व पुढे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर तसेच उपेक्षित-वंचितांसाठी अखेरपर्यंत समर्पित भावनेने कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देखील मोठे कार्य केले. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री शिवाजी सारखी अग्रगण्य शिक्षण संस्था तसेच श्रद्धानंद छात्रालय स्थापना, अस्पृश्यांना अंबाबाई मंदिर खुले करणे, वंचितांसाठी तलाव, विहिरी, पानवठे निर्माण करणे यासारखे प्रचंड मोठे सामाजिक कार्य केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची ओळख करून देताना को. ता. एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगाव चे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ऋणानुबंध होते, म्हणूनच के. बी. रोहमारे यांनी देशमुख यांना कोपरगाव येथे आमंत्रित देखील केले होते, असे सांगितले. अमरावती येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत व डॉ. दोरगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक व अतिथींचा परिचय करून दिला व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
