मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्या :- आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी करायचे राहिल्याने व अज्ञानापोटी किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरली गेल्याने असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मूळ उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे व त्यासाठी ई केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र ई केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व माहिती भरताना अज्ञानाअभावी चुकीची माहिती भरली गेल्यामुळे अनेक महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये बंद झाले आहेत.
राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेचा अपात्र असणाऱ्या व्यक्तींकडून गैरफायदा घेतला जावू नये यासाठी राज्य शासनाकडून ई-केवायसीच्या माध्यमातून फेर तपासणी केली आहे. परंतु कोपरगाव मतदारसंघातील अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी करायची राहिली. तर काहीची ई-केवायसी प्रक्रियेच्या दरम्यान नजरचुकीने चुकीची माहिती भरली गेली असल्याने अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरविले असल्याने कोपरगांव मतदारसंघातील बहुसंख्य महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे.
त्यामुळे ज्या महिला भगिनींची ई केवायसी अभावी किंवा ई केवायसी करतांना चुकीची माहिती भरली गेल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत अशा महिलांसाठी ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये पूर्ववत सुरू करावे यासाठी आपण पाठपुरावा करावा असे आ. आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *