
कोपरगाव प्रतिनिधी:-
“‘भौगोलिक माहिती प्रणाली’ या क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ मिळत नसल्याने अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत. तरी विद्यार्थ्यांनी यासारख्या कार्यशाळांच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करून आपले करिअर उज्ज्वल करावे.”असे प्रतिपादन मा. नितेश बनसोड यांनी येथे केले. स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर भूगोल विभाग आणि संशोधन केंद्राच्या विद्यमाने ‘भौगोलिक माहिती प्रणाली व ड्रोन प्रशिक्षण’ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. बनसोड बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे होते. नेवासा येथील ड्रोनचे तज्ञ मार्गदर्शक मा. विशाल कडलक यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, “सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा कार्यशाळांच्या आयोजनाला आमचे महाविद्यालय नेहमीच प्राधान्य देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन करिअर करावे आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.” कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे म्हणाले की, “या कार्यशाळेच्या निमित्ताने भूगोल विभागाने अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित केला, त्याबद्दल भूगोल विभागाचे विशेष अभिनंदन.”
दुसरे मार्गदर्शक मा. विशाल कडलक यांनी या क्षेत्रातील स्वानुभव कथन केले व महाविद्यालयाच्या मैदानावर ड्रोनचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. भूगोल विभागाचे प्रो. डॉ. वसुदेव साळुंके यांनी सर्वेक्षणासंदर्भात तसेच ड्रोनविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर भूगोल विभाग प्रमुख प्रो. डॉ. गणेश चव्हाण यांनी या कार्यशाळेत आमच्या महाविद्यालया सोबतच कोळपेवाडी महाविद्यालयातील प्रा. शेख, प्रा. मैंद , प्रा. पोटे आणि त्यांचे 30 विद्यार्थी त्याचबरोबर नेवासा महाविद्यालयातून प्रा. शौकत फकीर प्रा. निपुंगे व त्यांचे 20 विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याने ही कार्यशाळा फलदायी झाल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष सोनवणे यांनी, प्रास्ताविक प्रा. संपत माळी यांनी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रद्धा जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जयश्री खंडीझोड यांनी केले.
