

कोपरगाव प्रतिनिधी:-
त्रंबकेश्वर जोर्तिल्लींग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत. देणगी दर्शन रांगेसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे.
मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्रंबकेश्वर मंदिर परीसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजार होत असलेबाबत प्रसिध्द झाले होते. त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्री. सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेउन असे गैरप्रकार उघडकीस आणुन त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्रंबकेश्वर पोलीस ठाणेस सुचना दिल्या होत्या.

सदर बाबत खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्रंबकेश्वर परिसरातुन एकुण ५ इसमांना ताब्यात घेवुन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवुन ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती २०० रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती ७०० रुपये ते १,००० रुपये या दराने विकुन बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचे त्यांचे झडतीतुन मिळालेल्या मोबाईल मधुन व मेल आयडीचे हिस्ट्रीवरुन दिसुन आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस प्रशासनातर्फे तकार देवुन संघटीत पणे गुन्हा रजिस्टर कमांक १०२/२०२५ दाखल करण्यात आला असुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचे अत्तापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये एकुण अंदाजे ५,००० भाविकांना बनावट पास चढयाभावाने विकल्याचे दिसुन येत आहे.
कारवाई मध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचे दिसुन येत असुन त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची अवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांचेशी चर्चा झाली असुन त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ, श्री. वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, श्री. रवी मगर, त्रंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, श्री. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गावित, यांचेसमवेत पोहवा जाधव, पोहवा मुळाणे, पोशि बोराडे, पोशि राठोड, पोशि ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.
