महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाळ मिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ; डाळ मिल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ शक्य:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
शेतकर्यांनी केवळ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे. डाळ मिल प्रक्रिया उद्योग हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुल्यवर्धनामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे चेन्नई येथील नॅशनल ऍग्रो फाउंडेशन आणि कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय डाळ मिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे,अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, चन्नई येथील नॅशनल ऍग्रो फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. चंद्रकांत देवरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास साळवे आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. गणेश शेळके उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या कंबळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, आष्टी आणि यशवंत शेतकरी उत्पादक कंपनी, अंबाजोगाई या दोन प्रमुख शेतकरी उत्पादक कंपन्याच्या संचालकांना आणि प्रतिनिधी शेतकर्यांना डाळ प्रक्रिया तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान देणे हा आहे. यावेळी डॉ. सचिन नलावडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या धोरणात शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतात. हे प्रशिक्षण या कंपन्यांच्या सदस्यांना डाळ प्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापनाची माहिती देऊन त्यांना अधिक सक्षम बनवेल. ज्यामुळे ते सामूहिकपणे कार्य करून अधिक नफा कमवू शकतील. डॉ. कैलास कांबळे स्वागत करतांना म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये सहभागींना डाळ मिल यंत्रांची कार्यपद्धती, डाळींची गुणवत्ता तपासणी, प्रक्रिया करताना घ्यायची काळजी आणि तयार मालाच्या विक्रीचे नियोजन याबाबत सखोल माहिती दिली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विक्रम कड यांनी मानले. यावेळी नॅशनल ऍग्रो फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *