के. जे. सोमैया महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लब च्या वतीने आरोग्य विषयक प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव येथील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल फुलवर हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात जागतिक एड्स दिनाची पार्श्वभूमी नमूद करतांनाच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेबरोबरच सामाजिक सुरक्षेत आपली भुमिका नोंदवून आरोग्यविषयक जनजागृती यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल फुलवर यांनी एड्स या आजाराबद्दल मार्गदर्शन करताना या संसर्गाचे कारण व उपाययोजना यावर सखोल विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमांचा उद्देश नमूद करतांना राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग आरोग्यविषयक जनजागृती शिबिरात सतत सहभाग नोंदवित असल्याचे सांगितले. यासाठी महाविद्यालयातील रेड रिबन क्लब कार्यरत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय दवंगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *