
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
स्वयंसेवकांनी त्याग, समर्पण, समाजसेवा व देश सेवेचा मंत्र घेऊन काम करावे. युवकांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात संस्कार संस्कृतीची आठवण ठेवावी. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांनी निस्वार्थपणे तणमन-धनाने राष्ट्रीय सेवा योजनेची समाजोपयोगी कामे वर्षभर नियमित कार्यक्रमांद्वारे व सात दिवस खेडेगावात राहून करावी. स्वयंसेवकांनी विशेष शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक माहिती देऊन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी जनजागृती करून, गाव दत्तक घेऊन निस्वार्थ भावनेने देशसेवा केली पाहिजे तरच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट व उद्देश साध्य होऊ शकेल असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेची संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण कार्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी, 2025 मध्ये मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दहा जिल्ह्यातील स्वयंसेवकांमधून एक स्वयंसेवक व एका स्वयंसेविकेची निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. महावीरसिंग चव्हाण बोलत होते. यावेळी या निवड समितीचे परीक्षक म्हणून कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, एनसीसी कॅप्टन डॉ. सुनील फुलसावंगे, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी व सहाय्यक अधिक्षिका श्रीमती अर्चना टकले उपस्थित होते. यावेळी दहा जिल्ह्यातील स्वयंसेवक मुले, मुली यामधून वजन, उंची, रनिंग, परेड, नाट्य, संगीत, नृत्य, वादन, वकृत्व व व्यक्तिमत्व विकास या विविध चाचणीमधून एक स्वयंसेवक व एक स्वयंसेवीकेची पारदर्शीपणे निवड करण्यात आली. यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूरचा स्वयंसेवक प्रसाद मधुकर मासाळ व बारामती येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूनम बाळू तानवडे या स्वयंसेविकेची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार व डॉ. महावीर सिंग चव्हाण यांनी या दोन्ही स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी मध्यवर्ती परिसर, राहुरी येथे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध कृषि संलग्न महाविद्यालयातून आलेल्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांची उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यासाठी व प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी स्वयंसेवक निवडीकरिता विद्यार्थी कल्याण कार्यालयाचे कर्मचारी श्री. दिनेश भालेराव, श्री. आकाश साळवे, श्री. चांगदेव दातीर, श्री. बापूसाहेब गवते, श्री. ऋषी कदम, श्री. सागर ननावरे, श्री. बंडू तांबे, श्री. भास्कर भिंगारदे व श्री. सुनील बर्डे यांनी सहकार्य केले.
