लोकशाही अधिक बळकट, सक्षम व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा:- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):- राज्य घटनेने समाजातील प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. या अधिकाराचा उपयोग करून देशाची लोकशाही अधिक बळकट, सक्षम व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय, बेलापूर येथे मतदार नोंदणी, मतदारांचे अधिकार व जबाबदारी या संदर्भात स्वीप उपक्रमाअंतर्गत ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.कुलकर्णी बोलत होते.


कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी किरण पाटील-सावंत, तहसीलदार डॉ.मिलिंद वाघ, सरपंच स्वाती अमोलिक, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे राजेश खटोड, नंदू खटोड, अशोक साळुंके, चंद्रशेखर डावरे, डी.डी.पुजारी, प्राचार्य गुंफा साळुंके आदी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले , जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये जनतेला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. परंतू या बाबतीत आपण खूप भाग्यशाली आहोत. आपल्या देशातील प्रत्येकाला मतदान करून योग्य तो उमेदवार निवडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोनं करत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा.
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविन्यपूर्ण असे उपक्रम राज्यभरात राबविण्यात येतात. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साहित्याचे अवलोकन करत निवडणूक प्रक्रिया नीट समजून घेण्याचे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले.

डॉ. कुलकर्णी यांनी साधला विद्यार्थी-विद्यार्थिनीशी संवाद
कार्यक्रमा दरम्यान अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी देशात १९५२ सालापासून ते आतापर्यंत होत आलेली निवडणूक प्रक्रिया, त्यात झालेले बदल याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसनही केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्वयंसेवक म्हणून मोलाची कामगिरी पार पडलेल्या विद्यार्थ्यांचा डॉ.कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच नव मतदारांना मतदान ओळ्खपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *