
कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्यातील ४ विधानपरिषद मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे. कोपरगाव येथे ही अतिशय शांततापूर्ण वातावरणात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तहसील कार्यालय येथिल मतदान केंद्रावर सकाळ पासुनच शिक्षकांनी मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील बुथ क्रमांक 77 मध्ये 1082 पैकी 1033 तर बुथ क्रमांक 78 मध्ये 1086 पैकी 996 शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. कोपरगाव येथे 2168 मतदानापैकी एकूण 2029 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोपरगाव तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 93.58 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती
तहसीलदार व मतदान केंद्र अध्यक्ष संदिपकुमार भोसले यांनी दिली आहे.
सदर मतदान प्रक्रिया पार पडल्याने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे महायुतीचे उमेदवार आ. किशोर दराडे यांच्यासह 19 जणांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख असा बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता.
सोमवार दिनांक 1 जुलै रोजी नाशिक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
