वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, पुणे यांचेकडून पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास कुबोटा ट्रॅक्टर भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांचेकडून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास 21 एच.पी. कुबोटा ट्रॅक्टर आणि रोटावेटर, पेरणी यंत्र, सारायंत्र, नांगर व रिजर अशी पाच अवजारे भेट देण्यात आली. सटाणा जि. नाशिक येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील व पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्याकडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. ठोंबरे यांनी ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. सी. एस. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या उसाच्या विविध वाहनांची तसेच ऊस लागवड तंत्रज्ञान शिफारशीमुळे राज्यातील ऊस उत्पादनामध्ये क्रांती व साखर उद्योगाची भरभराट झाल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास कुबोटा ट्रॅक्टर अवजारासह भेट दिल्याबद्दल असोसिएशन प्रति आभार व्यक्त केले. आज विद्यापीठाचा 56 वा वर्धापन दिन साजरा होत असल्याबद्दल आयोजकांनी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ. थोरवे या शास्त्रज्ञांनी उपस्थित असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री शंकरराव सावंत कार्यकारी संचालक श्री. अजित चौगुले, लोकमंगल समूहाचे चेअरमन श्री. महेश देशमुख, नाथ म्हस्कोबा साखर कारखाना, धाराशिवचे चेअरमन श्री. राऊत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *