
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार व संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व पालक यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी इयत्ता १० वी चे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचा आनंद घेतला. प्राचार्य नुर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिकांना विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य नुर शेख यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी संबोधित करतांना प्राचार्य नूर शेख यांनी विद्यार्थ्यांना उद्याचे सुजाण, सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आवश्यक बदल अंगीकृत करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी प्राचार्य मनीष गायकवाड, शिक्षक झालेले हर्षद पवार, चैतन्य पवार, अदिती तासकर, सार्थक कोद्रे, रिया कोळपे व समृद्धी रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी आर्या काळे हिने केले तर आभार विद्यार्थी वेदांत आव्हाड याने मानले.
