संपूर्ण जगाला जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण हा युगंधर पुरुष होता:- ताकोते महाराज…

Uncategorized




कोपरगांव प्रतिनिधी:-
जीवनाविषयी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तरे भगवान श्रीकृष्णाने भगवतगितेमध्ये देऊन ठेवलेली आहेत. कोणत्याही चमत्काराविना श्रीकृष्णाचे अंतरंग जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा तो केवळ जुन्या रुढी, परंपरा मोडून काढणाराच नव्हे तर नवे विचार, नव्या प्रेरणा आणि संपूर्ण जगाला जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा युगंधर पुरुष होता असे प्रतिपादन विदर्भातील अकोला येथील कैवल्याश्रमाचे प्रमुख ह. भ. प. प्रशांत महाराज ताकोते यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या १९ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ‘ युगंधर श्रीकृष्ण ‘ या विषयावर ह. भ. प. ताकोते महाराज बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. तर व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक प्रमोद पाटील, ह. भ. प. विनायक महाराज वाघ, कोपरगांव नगरपालिकेचे माजी नगरसेवक मंगेश पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय, कोपरगांव येथील महिला महाविद्यालय, इंग्लिश मेडीयम स्कूल या शाळांमधील गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले.
युगंधर श्रीकृष्ण जाणून घेणं हा दिव्य योग आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत सांगायचे झाले तर हा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव आहे असे सांगून श्री ताकोते महाराज पुढे म्हणाले. युगानुयुगे धारण करावी अशी जीवनतत्वे श्रीकृष्णाने नुसती उच्चारली नाही तर, त्या जीवनतत्वानुसार ती जगून सुध्दा दाखवलेली आहेत. आपल्याला जर मानवी जीवन समजून घ्यायचे असेल तर, श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घेणे अनिवार्य आहे. कारण त्याच्या तत्त्वज्ञानाला ताजेपणा आहे. ते काल जितकं गरजेचं होतं त्यापेक्षा आजच्या काळात त्याची अधिक गरज आहे. साऱ्या जगताला भगवतगितेचे अमृत श्रीकृष्णाने पाजले आहे. श्रीकृष्णाच्या पराक्रमाकडे चमत्कार म्हणून पाहू नका. त्या पराक्रमामधून सगळ्या जगताला त्याने जो संदेश दिलेला आहे त्याचा अंगिकार करा. साडेपाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने दिलेल्या एकतेच्या संदेशाचे आपण पालन केले तर कोणत्याही अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतीय समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणजे, आपण आपल्या देवतांना चमत्कारांमध्ये आणि महापुरुषांना जातीपातीमध्ये जखडून ठेवतो. मात्र श्रीकृष्ण हा देव, परमात्मा, भगवान असा कोणी दुरचा राहात नाही. तो कधी आपला मित्र, सखा, सोबती, भावविश्वस्त होऊन जातो हे कळत देखील नाही. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेले शेवाळ तर्कशुध्द आणि सावधपणे दूर सारल्यास त्याचं युगंधरी दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही असे सांगून श्री ताकोते महाराज यांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांनी संवत्सर परिसरात मुलींच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या शैक्षणिक सुविधांविषयी गौरवोद्वार काढून हा शैक्षणिक महायज्ञ भविष्यातही अविरतपणे तेवत रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून संवत्सर व कोपरगांव येथे महाविद्यालये सुरु करण्यामागची पार्श्वभूमी विषद केली. परजणे आणि विखे पाटलांसारख्या सुसंस्कृत परिवाराकडून आम्हाला सेवेचा व आध्यात्माचा जो वारसा मिळालेला आहे तो पुढेही सुरु राहील यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास गोदावरी दूध संघाचे संचालक भाऊसाहेब कदम, नानासाहेब काळवाघे, भिकाजी झिंजुर्डे, संजय टुपके, सुदामराव कोळसे, गोरक्षनाथ शिंदे तसेच बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे, उत्तमराव माने, बाबासाहेब परजणे, लक्ष्मणराव साबळे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, सयराम कोळसे, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, अशोकराव काजळे, राजेंद्र काजळे, प्रभाकर मलिक, गोरखनाथ शिंदे, वाल्मिकराव पिंपळे, दिलीपराव उकिर्डे, नरेंद्र ललवाणी, रामभाऊ निकम, परभतराव निकम, सीताराम कांडेकर, राजेंद्र ढेपले, मनिष शहा, सतीश शेटे, बाळासाहेब सोनवणे, विठ्ठलराव गिते, विजय जगताप, आबा नानकर, अॅड. जयंत जोशी, किरण मेहेत्रे, शंकरराव परजणे, दिलीपराव ठेपले, अशोकराव दुपके. पंचायत समितीचे बाळासाहेब साबळे, बबनराव वाघमोडे, उत्तमराव पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी – विद्यार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *