
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित केली असल्याची माहिती तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्रावर भेट देवून पहाणी केली.पुढील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे.
तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर, डॉ.विजय गणबोटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर यांचे सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे कोविड हेल्थ उपचार,बाळांतपण आणि शस्त्रक्रिया याची स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहे.याकरिता स्वतंत्र प्रवेश द्वार असणार आहे.तशा आशयाचे फलक तेथे लावण्यात आले आहे. कोविड हेल्थ केअर सेंटर २० खाटांचे उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.तसेच अत्यावश्यक विभाग स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालयाचे आवारात औषध भांडार ईमारतीत कोरोना संसर्ग चाचणी दैनंदिन सकाळी ०९ ते १२:०० या वेळेत होत आहे.तसेच कोपरगाव तालुक्यातील नोंदणी झालेल्या ६० वर्षापुढील व दुर्धर आजार असणारे ४५ वर्षापुढील नागरिकांना सकाळी ०९:०० ते दुपारी ०५:०० या वेळेत ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात येणार आहे. ४५ वयोगटापुढील ईतर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरणाची नोंदणी केली असल्यास निर्धारित केंद्रावर दिलेल्या तारखेला जातांना वैद्यकीय प्रमाणपत्र व सुरु असलेल्या उपचाराची कागद पत्रे सोबत न्यावी.असे वैद्यकीय विभागाने कळविले आहे
तसेच शुक्रतीर्थ कोविड केअर लायन्स मुकबधीर विद्यालय, कोपरगाव येथे ४ मार्च पासून कार्यान्वित करण्यात येत आहे.तेथे सुमारे ५० रुग्णांना उपचार व सेवा देता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोना संसर्ग बाधित सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे.तेथे वैद्यकीय अधिकारी नियमित उपलब्ध असणार आहे.
ग्रामीण रुग्णालय येथे सुरु असलेली दैनंदिन बाह्यरुग्ण सेवा दि.४मार्च २०२१ पासून भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,(जुना नगरपालिका दवाखाना जवळ) कोपरगाव येथे स्थलांतरित करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
