के.जे.सोमैय्या महाविद्यालयात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : आंतरविद्याशाखीय अध्ययन’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणण समिति, बंगलुरु (नॅक) यांनी सुचविलेल्या नवीन सर्व शैक्षणिक सुधारणा प्राथमिक शिक्षण स्तर ते उच्च शिक्षण स्तरापर्यंत सर्वांनीच स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. कस्तुरीरंगन समितीने जो अहवाल तयार केला आहे, तो शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी ते महाराष्ट्र शासन यातील सर्व घटकांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. या समितीने धोरण ठरवितांना महाराष्ट्रातील पाच हजार महाविद्यालये व पन्नास हजार पेक्षा अधिक शिक्षकांची देखील यात मोठी भूमिका आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान चे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी येथे केले. ते ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : आंतरविद्याशाखीय अध्ययन’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी समारोपा प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी को. ता. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे होते.
डॉ. पाब्रेकर पुढे म्हणाले की, “या समितीच्या शिफारसीमध्ये भयमुक्त व खुल्या शिक्षणाची संकल्पना असून कौशल्याधारित विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट आहे.” अध्यक्षीय समारोपात संदीप रोहमारे म्हणाले की, “या कार्यशाळेमध्ये आम्हाला व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवर्गाला खूप लाभ झाला असून आम्ही संस्थेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण विचारविनिमय करूनच हे धोरण राबविणार आहोत.”
याप्रसंगी मुंबईस्थित वझे केळकर शिक्षण संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ. एम. आर. कुरुप म्हणाले की, “सदर शैक्षणिक धोरणामध्ये बऱ्याच उणीवा असून मूळ प्रश्न आर्थिक पाठिंब्याचा आहे. तो कोणी द्यावा ? हा खरा प्रश्न आहे. ही सर्व ही जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाची आहे. एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करण्यास कोठारी समितीने शिफारस केली होती. त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फक्त स्वप्नात दंग राहण्यात अर्थ नाही.” याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी देखील शैक्षणिक धोरणाविषयी प्रासंगिक विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, “मी प्राध्यापक होतो, तेव्हापासून मा. कुरूप सरांच्या संपर्कात आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊनच मी माझ्या तत्कालीन महाविद्यालयाचे नॅक मानांकन केले होते. आजही त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह व शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात वाढत्या व्यासंगाचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि तो घेऊनच आपण पुढील वाटचाल करणार आहोत.”
या दोन्ही सत्रांचे प्रास्ताविक आणि आभार या कार्यशाळेचे संयोजक व महाविद्यालयाच्या अंतर्गत हमी कक्षाचे प्रमुख डॉ. व्ही.सी. ठाणगे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. वर्षा आहेर व डॉ. एस. बी. दवंगे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. सी. ठाणगे, डॉ. एस. आर. पगारे, डॉ. जे. एस. मोरे, डॉ. व्ही. एस. साळुंके, डॉ. गणेश देशमुख, डॉ. के. एल. गिरमकर, डॉ. जी. के. चव्हाण आदि प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत महाराष्ट्र व महाराष्ट्रबाहेरील अनेक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी केली.

फोटोओळी:- राष्ट्रीय कार्यशाळेत उपस्थित प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी -विद्यार्थिनींना संबोधित करताना रुसा चे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *