नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीकांत बाळासाहेब सुसेयांची लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
मुळचे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीकांत बाळासाहेब सुसे Shrikant Suse यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. सुसे यांची २०१६ मध्ये आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर जम्मू काश्मीर केडरमध्ये नियुक्ती झाली. प्रांताधिकारी आणि नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी काम केल्यानंतर आता ते जिल्हाधिकारी झाले आहेत.
सुसे मुळचे शेवगाव तालुक्याचे रहिवाशी आहेत. त्यांची आई गृहिणी तर वडील जिल्हा न्यायालय येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. मात्र, श्रीकांत यांनी मोठ्या कष्टाने आयएएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठातील शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नगरच्या रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. चांगले गुण मिळाल्याने त्यांना पुण्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयात प्रवेश मिळाला. लहानपणापासूनच त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. महाविद्यालयात गेल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची स्पर्धा परीक्षाच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१६ च्या UPSC परीक्षेत त्यांची आयएएस म्हणून निवड झाली. त्यांची जम्मू काश्मीर केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली.
जम्मूमध्ये त्यांनी प्रांताधिकारी जम्मू (दक्षिण) या पदावर सुमारे दोन वर्षे काम केले. त्यानंतर बढती मिळून करोना काळात अतिरिक्त जिल्हाधकारी म्हणून त्यांनी कश्मीर प्रांतात काम केले. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून शोपियन जिल्ह्यात काही काळ काम केले. अलीकडेच त्यांची केंद्रशासित प्रदेश लडाख मधील लेह या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ‘केंद्रशासित प्रदेश झाल्यावर सामरिक दृष्ट्या महत्वपूर्ण लेह जिल्ह्यात विकासाच्या कामांना वेग देण्यावर आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर असेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *