अखेर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे अनावरण संपन्न; अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी मातंग समाजाच्या वतीने अभिवादन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या सात महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी (18 जुलै) करण्यात आले. समाज बांधवांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद राक्षे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा जनतेसाठी अखेर आज खुला करण्यात आला.
कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर आणि येवला रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात हा अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी भरीव प्रयत्न केले आहेत.
शासनाची परवानगी, आचारसंहिता व इतर कारणांमुळे डिसेंबर 2021 पासून या पुतळ्याचे अनावरण रखडले होते. त्यात काही लोकांनी राजकारण आणून खोडा घातला होता. त्यामुळे हा पुतळा तेव्हापासून झाकून ठेवलेला होता त्यामुळे पुतळ्याचे लोकार्पण होऊ शकले नव्हते. मातंग समाज बांधवांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. अखेर आज 18 जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनोद राक्षे यांच्या नेतृत्वाखाली अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करून हा पुतळा जनतेसाठी खुला करण्यात आला.
याप्रसंगी लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष शरद छबुराव त्रिभुवन, विधिज्ञ नितीन पोळ, अनिल मरसाळे, सोमनाथ मस्के, भाऊसाहेब आव्हाड, अनिल पगारे, अर्जुन मरसाळे, प्रवीण शेलार, संदीप निर्भवणे, अनिल जाधव, निसारभाई शेख, विनोद वाकळे, सुजल चंदनाशिव, रोहिदास पाखरे, यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित आणि उपेक्षित समाजाच्या आणि तळागाळातील कष्टकरी लोकांच्या हक्कांसाठी लढणारे तसेच आपल्या साहित्यिकृतींना जगात नावलौकिक मिळवलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळा सर्वात आधी कोपरगाव शहरात उभारण्यात आला होता. याचे संपूर्ण श्रेय कोपरगाव चे माजी आमदार माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना जाते.
कोपरगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणीचा विषय पुढे आल्यानंतर स्व. शंकराव कोल्हे यांनी स्वतः अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म गावी वाटेगाव (जि सांगली) येथे जाऊन आण्णाभाऊंच्या कुटुंबाकडून त्यांचा फोटो मिळवला या फोटो वरून अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळा तयार करून तो कोपरगावातील मुख्य रस्त्यावर अण्णाभाऊ साठे चौकात बसविण्यात आला.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्व. शंकराव कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगावात अण्णाभाऊंचा पुतळा उभारला गेला. त्यानंतर याच ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुनारकृती पुतळा बसून त्यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली. यासंबंधीचा ठराव कोपरगाव नगरपरिषद समंत करण्यात आला व त्यानुसार अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याची २६ डिसेंबर 2021 रोजी वाजत गाजत स्थापना करण्यात आली. परंतु निवडणूक आचारसंहिता व इतर कारणांमुळे हा पुतळा कपड्याने झाकून ठेवण्यात आला होता.
तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही हा पुतळा आच्छादित करून ठेवला होता. या पुतळ्याचे रीतसर अनावरण करून तो जनतेसाठीच खुला करण्याची मागणी लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष शरद त्रिभुवन त्यांची पत्नी स्वातीताई त्रिभुवन विनोद राक्षे नितीन पोळ व मातंग समाज बांधवांनी केली होती.
पुतळ्यासाठी परिश्रम घेणारे स्व. शंकरराव कोल्हे तसेच शासनाचे प्रतिनिधी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करावे अशी मागणी समाज बांधवांना केली होती. पण नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्षित करून सतत चाल ढकल केली. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 6 एप्रिल रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट घातला गेला ही चर्चा सुरू असतानाच 29 मार्च 2022 रोजी दुपारी शरद त्रिभवन आणि त्यांची पत्नी स्वाती त्रिभुवन यांनी कापडाने झाकून ठेवलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हा पुतळा लोकांसाठी खुला केला त्यावेळी तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी त्यावेळी त्रिभुवन दांपत्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर हा पुतळा पुन्हा झाकून ठेवण्यात आला होता.
अखेर आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिवशी अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मातंग समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे तसेच या स्मारकासाठी अथक परिश्रम घेणारे स्व.शंकरराव कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे तसेच शासनाचे, मातंग समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *