राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय पुरस्कार:- सुरेश पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
(शिर्डी):-
शासनाच्या 2021-22 या वर्षाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या अभियानात ‘प्रशासकीय गतिमानता’ अंतर्गत विभागीय स्तरावरील समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधील तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकाविला आहे.
महाराष्ट्र शासनाच्यासामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो.ना.बागुल यांच्या स्वाक्षरीने याबाबतच्या शासननिर्णय 18 एप्रिल 2022 रोजी प्रसिध्द झाला आहे. प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.
या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत विभागीय स्तरावरील समित्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांतील तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार राहाता पंचायत समितीला मिळाला आहे. रोख 4 लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पंचायत समितीने नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे थेट निराकरण करणे, कोरोना कालावधीत मदत, बचत गट विक्री व प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प सक्षमपणे राबविणे या कामासाठी हा पुरस्कार राहाता पंचायत समितीला देण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पंचायत समितीने नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे वेळोवेळी निराकरण करणे, दप्तर दिरंगाई टाळत नागरिकांची कामे विनाविलंब करणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कोरोना कालावधीत सर्व शासकीय विभागाचे सहकार्य घेत श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून कामगारांचे यशस्वी स्थलांतर घडवून आणले, जिल्हा परिषद सदस्या शालीनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून बचतगटांचा मेळावा घेतला जातो. तालुक्यातील कुपोषित बालकांना पौष्टीक आहार देण्यात आला त्यामुळे कुपोषणांची पातळी कमी झाली, लोणी येथे 57 आदिवासी व्यक्तींसाठी सिंधूताई आदिवासी निवारा उभारण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस उपक्रम, प्लॉस्टीक बंदी, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, आरोग्य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम राहाता पंचायत समितीने यशस्वीपणे राबविले आहेत. या उल्लेखनिय व उत्कृष्ट कामामुळे राहाता पंचायत समितीने केंद्र शासनाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार व राज्य शासनाचा यशवंत पंचायत राज अभियानातील पुरस्कार मागील तीन वर्ष सलग पटकाविला आहे.
शासनाचा पुरस्कार मिळाल्यावर राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे म्हणाले की, “जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, खासदार सुजय विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद सदस्या शालीनी विखे पाटील यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्यामुळे राहाता पंचायत समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. यासाठी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कामात वेळोवेळी दाखविलेली तत्परता व गतिमानतेला या पुरस्काराचे श्रेय जाते. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *