संविधानाने विविधतेने नटलेला देश एकसंध बनविण्याचे महान कार्य केले:- सुशांत घोडके…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गौतम बुद्धांचा विचार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला व दैदिप्यमान कार्यातून देशात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून केलेले कार्य अद्वितीय स्वरूपाचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने विविधतेने नटलेला देश एकसंध बनविण्याचे महान कार्य केले असे मत भारत सरकारचे स्वच्छ्ता दुत व कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेचे संस्थापक सुशांत घोडके यांनी व्यक्त केले.


येथील श्री. सद्गुरू गांगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त मराठी व सांस्कृतिक विभाग आणि सूर्यतेज संस्था कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्याना प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप होते.


घोडके पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.त्यांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जीवन जगताना आत्मसात करणे हीच बाबासाहेबाना खरी श्रध्दांजली ठरेल.
महाविद्यालयातील कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक काळातील थोर पुरुष होते. देशाच्या कल्याणासाठी त्यांनी आपली बुद्धिमत्ता अविरतपणे पणाला लावली.देशातील सर्व कल्याणकारी योजनांचे निर्माते डॉ. बाबासाहेब असून आज देशापुढे जे भीषण प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरे त्यांच्या विचारात सापडतात. मात्र बाबासाहेबाना एका विशिष्ट जातीत कोंडण्याचे दुर्दैवी काम भारतीय करतात ही खंतही त्यांनी व्यक्त केली.


अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ. रमेश सानप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपार परिश्रमातून लिहिलेली राज्यघटना हा देशाची एकात्मता जोपासणारा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेमुळेच आज भारतीय लोकशाही बळकट बनली आहे. राज्यघटनेतील तत्वांचे पालन करणे सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.
सदर प्रसंगी इतिहास विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवकार्याचा परिचय करून देणाऱ्या भितीपत्रिकेचे प्रकाशन मानयवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी व v सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील काकडे यांनी केले तर डॉ. बी. बी. देवकाते यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विजय निकम, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *