
अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह ७ जणांना ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सुविचार गौरव…
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. ०५ मार्च रोजी होणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.

समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंना सुविचार गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये अष्टपैलु चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हेमंत राठी यांना “जीवन गौरव” पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं.क.कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

शनिवार दि. ०५ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रवेशिका (पासेस) देण्यात आले असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे संयोजक आकाश रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.
