कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊसाला २,५०० रुपये भाव देणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६७ वा गळीत हंगाम सुरु…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरु होत असून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी ऊस दराबाबत निर्णय जाहीर करून २०२१-२२ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला २५००/- रुपये दर जाहीर करून ऊस दराच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

         कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व  गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. आशुतोष काळे यांनी ऊस दर जाहीर करून कामगारांना देखील मागील वर्षीप्रमाणे १८% बोनस देण्याचे जाहीर करून कामगारांची दिवाळी गोड केली आहे.  

           यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मागील दोन हंगामामध्ये ऊस उत्पादन व साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले मात्र साखर निर्यातीस दिलेला सकारात्मक प्रतिसाद व इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आल्यामुळे साखर साठे नियंत्रित ठेवता आले अन्यथा साखरेचे दर घसरले असते. मात्र साखर कारखानदारी आर्थिक नियोजन करून दिवसेंदिवस व्यवसायाभिमुख व जागतिक बदलास प्रतिसाद देत मार्गक्रमण करीत आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात ७.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून कारखाना कार्यक्षेत्रात १०,५०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. त्यातूनच गाळपाचे उद्दिष्टाइतका ऊस उपलब्ध होणार असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील पारंपारिक गेटकेन ऊस सेंटरवरून यावर्षी ऊस घेता येणार नाही. आजवर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट एकच ऊस दर दिल्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील अनेक ऊस उत्पादक शेतकरी  ऊस गळीतास घेण्याचा आग्रह करीत असले तरी यावर्षी ते शक्य नाही. मात्र कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होवून गाळप क्षमता वाढल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          केंद्र शासनाने मागील वर्षाचे एफआरपी मध्ये प्र.मे. टन रु.५०/- वाढ करून ती चालू हंगामासाठी रु.२९००/- प्र.मे. टन १०% साखर उताऱ्याकरिता केलेली असली तरी इंधनाचे दर वाढल्यामुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. संपूर्ण जगाच्या ऊस दराचा विचार केल्यास आपल्या देशातील ऊसाचे दर साखर उत्पादन खर्च हा जास्त आहे त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा कसा मिळविता येईल यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे.

      मागील चार वर्षात आपल्या देशातून १७० लाख मे. टन साखर निर्यात झाली असून चालू हंगामात २०२१ मध्ये जागतिक स्तरावर जवळपास ४० ते ६० लाख मे. टन साखरेचा तुटवडा भासणार आहे. ब्राझील देशात मोठा दुष्काळ व प्रतिकूल हवामानाचा ऊस उत्पादनावर परिणाम होवून साखर उत्पादन घटणार आहे व थायलंडमध्ये देखील साखर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या आपल्या देशाला साखर निर्यातीची चांगली संधी असून आंतरराष्ट्रीय साखर दराचा विचार करून चालू हंगामात कच्ची साखर निर्मिती करून साखर निर्यात करण्याबाबत लवकरच घेवू. सहकार खाते राज्याच्या अखत्यारीत असलेला विषय आहे मात्र केंद्र शासनाने नव्याने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. देशातील सहकार चळवळ अधिक बळकट व सक्षम करण्याचा यामागे उद्देश असून या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजना देशासाठी राबविणे अभिप्रेत आहे. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी आयकराबाबत कुठल्याही साखर कारखान्यांवर कार्यवाही होणार नसल्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली.  

   याप्रसंगी जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, एम. टी. रोहमारे, कारभारी आगवण, नारायण मांजरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ,  सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, संभाजीराव काळे, कारखान्याचे जनरल  मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल  मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,  सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, चिफ अकौंटंट सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, उद्योग समुहातील सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, सभासद, शेतकरी व कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

चौकट :- राज्यात महाविकास आघाडी सरकार सथापन झाल्यापासून नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. कोरोनाचे संकट व चार–चार चक्रीवादळांच्या व अतिवृष्टी, महापूर अशा आपत्तीपुढे न डगमगता नुकसानीची भरपाई राज्यसरकार देत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील मोठ्या प्रमाणात मतदार संघासाठी निधी आणला आहे मात्र त्यांनी कधी त्याची प्रसिद्धी केली नाही व मला देखील प्रसिद्धीची हाव नाही. मात्र काही काम न करता देखील प्रसिद्धी करीत असल्यामुळे प्रसिद्धी करावी लागते मात्र सवंग लोकप्रियतेसाठी कधीही प्रसिद्धी करणार नाही. दोन वर्षातील दीड वर्ष कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात गेले. विकासाची सर्व कामे एकाच वेळी होणार नसली तरी टप्याटप्याने सर्वच विकासकामे मार्गी लावणार आहे. ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळविली असून ऑक्सिजन प्रकल्पाची देखील उभारणी केली आहे. कोपरगाव शहरातील ५ नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, विजेचे प्रश्न तसेच अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. अनके रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केलेले असून आजपर्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यांसाठी ९५ कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. – आ. आशुतोष काळे.

फोटो ओळ-१) कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत मोळी टाकतांना कारखान्याचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक मा.आ. अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई काळे, कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे, उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *