निळवंडे शिर्डी कोपरगांव शहर संयुक्त पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वीत करावी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिर्डी कोपरगाव अशी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली असून ती तातडीने कार्यान्वित करावी या मागणीचे निवेदन श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना सोमवारी देण्यात आले त्यात ही मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपचे नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, अतुल काले, व्यापारी नेते नारायण अग्रवाल, रिपाईचे जितेंद्र रणशूर, मनसेचे निलेश काकडे आदी उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिर्डी व कोपरगांव शहराला वारंवार भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा शताब्दी वर्षानिमीत्त निळवंडे धरणातुन बंद पाईपलाईनव्दारे श्री साईबाबा संस्थान,शिर्डी -शिर्डी नगरपंचायत व कोपरगांव शहर संयुक्त पाणी पुरवठा योजना तत्कालीन महाराष्ट्र सरकार८ व तत्कालीन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने मंजुर दिली होती. देश-विदेशातुन लाखो भाविक दरवर्षी शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात, भविष्यातही शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढणारच आहे.
काही वर्षापुर्वी शिर्डी येथे तिव्र पाणीटंचाई मुळे साईभक्तांनी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी काही काळ शिर्डीत येवू नये असे जाहीर आवाहान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने केले होते. तसेच शिर्डी व कोपरगांव शहराला सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमी असते.
गेल्या कित्येक वर्षापासुन कोपरगाव शहराला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा केला जातो उन्हाळ्यामध्ये हा पाणी पुरवठा कधी कधी पंधरा दिवसाने झालेला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाल होतात. काही वर्षापुर्वी शहरातील नागरीकांना रेशनकार्ड व्दारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली होती.
कोपरगाव शहराला सध्याची असलेली पाणी पुरवठा योजना खुपच कमी पडत आहे. नागरीकांना पिण्याचे पाणी पुरविण्यास कोपरगांव नगरपालिकेची यंत्रणा अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करुन शिर्डी व कोपरगाव शहराला दररोज शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे म्हणुन सन २०१५ मध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या तत्कालीन आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांचेकडे निळवंडे धरणातुन शिर्डी पर्यंत येणारी बंद पाईपलाईनची योजना पुढे कोपरगांव शहरापर्यंत आणण्यात यावी अशी मागणी केली होती.
त्यास२० जुलै २०१५ रोजी विधानसभा पावसाळी अधिवेशनात निळवंडे धरणातुन शिर्डी पर्यंत येणारी बंद पाईपलाईन पुढे कोपरगांव शहरापर्यंत नेण्यात यावी म्हणुन विधानसभेच्या सभागृहाने देखील मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी व्यवस्थापन समितीने २८ एप्रिल २०१७ रोजीच्या सभेत विषय निर्णय २८०ने सभेत चर्चा होवुन निळवंडे धरणातुन शिर्डी पर्यंत येणारी पिण्याची पाईपलाईनची पुढे कोपरगांव शहरासाठी आणणेसंदर्भात आवश्यक कारवाई करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानंतर दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय क्रमांक सांसवि २०१५/१००७/ प्र.क्र.१७७ (भाग-१) का. १६ अन्वये विधी व न्याय विभागाकडुन वाढीव श्री साईबाबा संस्थान शिर्डी, नगरपंचायतकोपरगांव नगरपालिका संयुक्त पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर दिनांक ३ एप्रिल २०१८ रोजी संस्थानच्या वतीने वृत्तपत्रात ई निवीदा सुचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेच्या पाणी आरक्षण प्रस्तावासही मान्यता मिळालेली असुन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या नियामक मंडळाच्या १५ फेब्रुवारी २०१७ चा ६३ व्या बैठकीस मंजुर ठराव नुसार अध्यक्ष गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी आदेश निर्गमीत केलेले आहे. ही वस्तुस्थिती असतांना त्यावेळेस राजकीय व्देषापोटी योजने संदर्भात मा.उच्चन्यायालयात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
परंतु तत्कालीन पाणी टंचाईचा व परिस्थितीचा विचार करुन मा. उच्चन्यायालयाने ही योजना व्हावी याबाबत सकारात्मक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सदर योजना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ व कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु केल्यास शिर्डी व कोपरगांव शहरातील नागरीकांचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्याच्या दृष्टीने निळवंडे धरणातुन बंदिस्त पाईपलाईनने शिर्डी व कोपरगाव करीता असलेली संयुक्त पाणी पुरवठा योजना पुर्ण होऊ शकते असे निवेदनात महटले आहे.

फोटो ओळी:- कोपरगाव
निळवंडे शिर्डी कोपरगांव शहर संयुक्त पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वीत करावी या मागणीचे निवेदन भाजपा-शिवसेना, रिपाई, मनसेच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *