Uncategorized

गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींची विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड पारनेर, कर्जतला नमवून अंतिम फेरीत बाजी; सोलापूर येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने दमदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेत धडक मारली आहे. सेंट मेरी स्कूल, नेवासा येथे आयोजित या स्पर्धेत गौतमच्या मुलींनी पारनेर व कर्जत तालुक्यांच्या संघांना सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात राहाता तालुक्यातील विखे हायस्कूल, गोगलगावच्या संघाविरुद्ध चुरशीच्या लढतीत विजय मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. आता १५ व १६ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत हा संघ अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय,अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, जिद्द, संघभावना आणि खेळातील समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. उपांत्यपूर्व सामन्यात पारनेर तालुक्याच्या संघाचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कर्जत तालुक्याच्या संघावरही सरळ सेटमध्ये मात करत अंतिम फेरी गाठली.अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूल आणि विखे हायस्कूल, गोगलगाव या दोन संघांमध्ये रंगतदार मुकाबला झाला.पहिल्या सेटमध्ये गौतमच्या मुलींनी २५-१६ अशी बाजी मारली; मात्र दुसऱ्या सेटमध्ये गोगलगावच्या संघाने २५-२१ असा विजय मिळवत सामन्यात चुरस निर्माण केली. त्यामुळे निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निर्णायक क्षणी गौतमच्या मुलींनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत १५-४ अशा मोठ्या फरकाने सेट जिंकला आणि स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

खेळातील सातत्य, अचूक सर्व्हिस, प्रभावी बचाव आणि संघातील उत्कृष्ट समन्वय यांच्या जोरावर गौतमच्या मुलींनी हा विजय साकारला. जिल्हास्तरावरील या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,आता विभागीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव काळे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे निरीक्षक नारायणराव बारे आणि शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.हे यश विद्यार्थिनींची मेहनत, शाळेतील क्रीडा संस्कृती आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी नमूद केले. संघाच्या या यशस्वी कामगिरीसाठी प्रशिक्षक राजेंद्र आढाव, इसाक सय्यद आणि शाळेचे क्रीडा विभागप्रमुख रमेश पटारे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, हाऊस मास्टर्स, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या मुली अहिल्यानगर जिल्ह्याची मान उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *