एस एस जी एम महाविद्यालयाकडून आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार…

रयतसेवेसाठी हक्काचा आमदार म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार :- आ. विवेक कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिक्षण क्षेत्रात वाढत्या बदलाच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित रयत शिक्षण संस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य करत आहे. एस एस जी एम महाविद्यालयाशी माझा आगळा वेगळा ऋणानुबंध आहे.प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती हा शिक्षकांचा विद्यार्थी असतो त्यामुळे जनसेवेचे सामाजिक कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार झाल्यानंतर होणारा हा सन्मान माझ्यासाठी विशेष असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे विधानपरिषद सदस्य झाल्याबद्दल आ. विवेक कोल्हे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.तसेच कल्पतरू नियतकालिक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संदीप वर्पे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेश बोळीज, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काले, अश्वमेधचे प्रमुख ज्ञानेश्वर वाकचौरे, शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्यासह सर्व उपप्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आ. कोल्हे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती ही शिक्षकांचीच विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असते. त्यामुळे शिक्षकांच्या हस्ते होणारा सन्मान हा माझ्यासाठी विशेष अभिमानाचा क्षण आहे. एस.एस.जी.एम. कॉलेजशी माझे जुने ऋणानुबंध असून रयत शिक्षण संस्थेतील माझ्या प्रवासाची सुरुवात याच महाविद्यालयातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले.रयत शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक शरद पवार यांची अलीकडेच भेट घेतल्याचा उल्लेख करताना त्यांनी संस्थेविषयी असलेली त्यांची तळमळ अधोरेखित केली. स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांनी संस्थेच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षकांच्या समोर बदलत्या युगात अनेक आव्हाने आणि संधी आहेत त्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे.
महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देताना आ. कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने त्यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेसमोरील प्रश्न सोडविण्यासाठी एक रयत सेवक म्हणून मी सदैव कटिबद्ध राहणार आहे,कारण आता तुमचा हक्काचा माणूस सत्तेत आहे त्यामुळे हक्काने आपण प्रश्न सांगा असे म्हणाले.ॲड. संदीप वर्पे यांना देखील रयतचा सेवा वारसा लाभला आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाची अधिक प्रगती व्हावी अशी भावना मांडली.
ॲड. संदीप वर्पे यांनी एक हक्काचा आमदार आपल्याला लाभला आहे.सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे नेतृत्व म्हणून आ.विवेक कोल्हे यांची मदत होणार आहे.माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपीनदादा कोल्हे यांचा माझ्या राजकीय जडणघडणीत मोठा वाटा आहे. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत राजकीय जोडे बाजूला ठेवत काम करण्याची सूचना आहे.आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून आ. विवेक कोल्हे यांच्यासारखा सरकार दरबारी आपले प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा माणूस आता आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
