Uncategorized

कोल्हेंकडून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक,
काळे गटाच्या उपसभापती व सदस्यांच्या राजीनाम्याचा निर्णय योग्यच :- मा.व्हा.चेअरमन ज्ञानदेव मांजरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मोर्वीस उपबाजार समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होईल, वाहतूक खर्च वाचेल आणि पश्चिम भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल हि अपेक्षा फोल ठरली आहे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांना आजवर कोल्हेंकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळाली असून त्याची प्रचीती पुन्हा एकदा मोर्वीस उपबाजार समिती सुरु करण्याच्या उदासीनतेतून दिसून आली आहे. कोल्हेंच्या सांगण्यावरून सभापती साहेबराव रोहोम यांनी या उपबाजार समितीमध्ये सव्वा वर्षात फक्त वजनकाटा बसवला. हि एक प्रकारची पश्चिम भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक असून अजूनही कोल्हेंकडून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. त्यामुळे काळे गटाच्या उपसभापती व सदस्यांनी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन ज्ञानदेव मांजरे यांनी म्हटले आहे.
इतर उपबाजार समित्यांप्रमाणे कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उपबाजार समिती होवून शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय दूर व्हावी हि आमदार आशुतोष काळे यांची प्रामाणिक इच्छा होती. तालुक्याच्या पश्चिम भागातील मोर्वीस (धामोरी) येथील हि उपबाजार समिती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी काळे गटाच्या उपसभापती व सर्व सदस्यांचा आग्रह होता परंतु या उपबाजार समितीचे भूमिपूजन होऊन जवळपास सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होवूनही या ठिकाणी बाजार समितीने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी सुरु केलेली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षापासून सभापती साहेबराव रोहोम यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभारामुळे बाजार समितीच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. तरी देखील कोल्हे सभापती साहेबराव रोहोम यांना पाठीशी घालत आहे यातून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्रास व्हावा हि कोल्हेंची ईच्छा सभापती साहेबराव रोहोम पूर्ण करीत असल्याचे अधोरेखित होत आहे.
सव्वा वर्षात या उपबाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी झाली नसल्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला एक रुपयाचे उत्पन्न मिळालेले नाही. या उपबाजार समितीसाठी कराराने घेण्यात आलेल्या सहा एकर जागेसाठी जागा मालकाला प्रती वर्ष प्रति एकर ५० हजार याप्रमाणे एका वर्षाला बाजार समितीला रुपये ०३ लाख रुपये भाडे मोजावे लागत आहे. सव्वा वर्षाचे एकूण भाडे रक्कम पावणे चार लाख रुपये होत असले तरी बाजार समितीला मात्र चार आण्याचे पण उत्पन्न मिळालेले नाही. सभापती साहेबराव रोहोम नेत्याच्या मर्जीप्रमाणे वागत असून त्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अधोगती होत आहे. हे पाप आपल्या माथी लागू नये यामुळे काळे गटाच्या उपसभापती व सदस्यांनी राजीनामा देण्याच्या भूमिकेचे पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या वतीने ज्ञानदेव मांजरे यांनी समर्थन केले आहे.

        कोल्हेंकडून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक ------

चौकट :- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांबाबत कोल्हेंनी नेहमीच दुजाभावाची भूमिका घेतली आहे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे पाप त्यांनी वारंवार केले आहे. ज्यावेळी मंजूर बंधारा पहिल्यांदा वाहून गेला त्याचवेळी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या कोल्हेंनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे हा बंधारा तब्बल तीन वेळा वाहून गेला फक्त वाहून नाही गेला तर शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी, उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून जावून असंख्य शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले. हे कोल्हेंच्या बेपर्वाईचे परिणाम होते. आज आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सव्वा वर्ष उलटूनही मोर्वीस उपबाजार समिती सुरू न होणे हे देखील कोल्हेंच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांप्रती असलेल्या दुजाभावाचे आणखी एक ठळक उदाहरण आहे. -व्हा.चेअरमन ज्ञानदेव मांजरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *