

कोपरगाव प्रतिनिधी
(कोकमठाण):- भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्रात येत्या २५ व २६ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या दत्तक आखाडा योजने अंतर्गत मुलांची कुस्ती निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पंधरा वर्षाखालील मल्लांसाठी हि स्पर्धा आहे. त्यातून तिस मल्लांची निवड केली जाईल. त्यांना केंद्र सरकारकडून दरमहा एक हजार रूपये शिष्यवृती, स्पोर्ट्स किट व आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
कुस्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीगीरांनी या निवड चाचणी साठी उपस्थित राहावे. असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
इच्छुक खेळाडूंनी येत्या २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आत्मा मालिक कुस्ती केंद्रात हजर रहावे. जन्मदाखला, आधारकार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईझ फोटो हे कागदपत्र सोबत आणावेत. ही निवड चाचणी प्रक्रिया भारतीय खेल प्राधिकरणाचे प्रशिक्षक रुपरेंदर पुनिया आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भरत नायकल यांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
———-चौकट——–
नंदकुमार सुर्यवंशी (अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट, कोकमठाण) – आत्मा मालिक कुस्ती केंद्रात सध्या ८५ मल्ल प्रशिक्षण आणि सराव करीत आहेत. भारतीय खेल प्राधिकरणाच्या निवड चाचणीत जे तिस मल्ल निवडले जातील त्यांना या केंद्रात राहून प्रशिक्षण घेतात. त्यांची वर्षभरातील विविध कुस्ती स्पर्धातील कामगारी लक्षात घेऊन चार वर्षे प्रशिक्षण दिले जाते.
