नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका, तातडीने नाले सफाई मोहीम सुरु करा:- शैलेश साबळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी साचल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यांनी सुरु होणाऱ्या पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका तातडीने नालेसफाई मोहीम सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला केली आहे.
शहरातील विविध प्रभागातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा साचला असल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारींचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. या अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून दुर्गंधीयुक्त पाण्याचा नागरिकांना त्रास होत आहे.यामुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोठ्या प्रमाणावर रोगराई आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नाले सफाई करतांना केवळ वरवरची स्वच्छता न करता शहरातील छोटे-मोठे नाले आणि मुख्य गटारीतील गाळ पूर्णपणे बाहेर काढणे गरजेचे आहे. बाहेर काढलेल्या गाळाची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून तो पुन्हा नाल्यात जाणार नाही आणि नाला तुंबणार नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला असून पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन नियोजनबद्ध काम करणे आवश्यक असून तुंबलेल्या नाल्यांचा आणि साचलेल्या सांडपाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून त्यामुळे तातडीने नालेसफाई मोहीम सुरु करावी अशी मागणी शैलेश साबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *