जन्म ते अंत्य, विश्वास, संस्कार आणि गुरुत्वाची अखंड परंपरा जपणारे जंगम ( स्वामी )परिवार :- गोरे सर….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जन्म ते अंत्य.. विश्वास, संस्कार आणि गुरुत्वाची अखंड परंपरा
जंगम ( स्वामी )परिवार

उत्तम कांबळे यांच्या “ माणसांच्या कथा ” मधल्या अव्यक्त माणसांच्या जगण्यांच्या ओळी वाचताना जसं मन थबकतं, तसंच कोपरगावच्या इतिहासाच्या पानांत डोकावताना काही माणसं आपल्या अस्तित्वानेच कथा बनून उभी राहतात…
त्या कथांपैकीच एक हृदयात घर करणारी कथा म्हणजे जंगम (स्वामी )हळदीकुंकू वाले पटवेकरी
बिरोबा चौकातील ती छोटीशी दुकाने…
पण त्याला कुठेही भिंत नाही पण ते आहे जीवनाचं संपूर्ण चक्र जन्मापासून अंत्यापर्यंत !
कधीकाळी घोड्यावरून गावोगावी जाऊन गाठण करणारे दशरथ जंगम बाबा स्वामी… व बाबुराव दशरथ जंगम (स्वामी)
त्यांनी पेटवलेला विश्वासाचा दिवा आजही तितक्याच तेजाने प्रज्वलित आहे.
पुढची पिढी बाळासाहेब जंगम, छबुराव जंगम स्वामी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या, बाबासाहेब, प्रशांत , राहूल, शाम, जितेंद्र यांनी
आधुनिकतेची कास धरत परंपरेचा हात घट्ट पकडून उभ्या आहेत.
आता या परंपरेला त्यांनी दिला आहे एक नवा आयाम उद्योगाचा!
नवरदेवाच्या कपाळावर शोभणाऱ्या मंडवळ्या , बाशिंग यांचा होलसेल व्यवसाय सुरू करून
या पवित्र परंपरेला त्यांनी व्यापारी विस्तारही दिला आहे.
पण या सगळ्यापलीकडे…
जंगम ( स्वामींचं ) खरं मोठेपण आहे त्यांच्या “ गुरुपदात !”
लिंगायत वाणी, गवळी, बुरुड या समाजांच्या विवाहविधींमध्ये
हे केवळ साहित्य पुरवणारे नाहीत…
तर ते असतात संस्कार घडवणारे गुरु!
मंगलाष्टकांच्या स्वरांत,
विवाहाच्या वेदीवर,
कन्यादानाच्या त्या पवित्र क्षणी…
त्यांचा मंत्रोच्चार म्हणजे केवळ विधी नसतो,
तो असतो परंपरेचा श्वास आणि श्रद्धेचा स्पंदन!
नवजात बाळाच्या पहिल्या पूजेपासून…
लग्नातील मंगल गजरापर्यंत…
आणि शेवटच्या प्रवासाच्या शांततेपर्यंत…
प्रत्येक टप्प्यावर त्यांची उपस्थिती म्हणजे
जीवनाच्या प्रत्येक वळणावरचा आधार !
महिलांच्या विश्वासाचं हे केंद्र
सोन्याचे दागिने, मंगळसूत्र , काळेम णी, डोरले , मनचली, डोरल्याच्या पाळ्या
हे सगळं ते इतक्या नितळ प्रामाणिकपणाने सांभाळतात,
की विश्वासही इथे नतमस्तक होतो.
हळद, कुंकू, बुक्का, शेंदूर, उद…
हे फक्त वस्तू नाहीत,
तर त्या आहेत श्रद्धेच्या रंगांनी रंगलेले भावविश्व !
साधा पेहराव, कपाळावर शिवभस्म ,
आणि वागण्यातली नम्रता…
या सगळ्यांतून जंगम समाजाची खरी ओळख उमटते
सेवा, श्रद्धा, संस्कार आणि गुरुत्व!
कोपरगावच्या गजबजलेल्या चौकात उभं राहून
जेव्हा या दुकानाकडे नजर जाते,
तेव्हा जाणवतं …
ही माणसं केवळ व्यवसाय करत नाहीत…
तर प्रत्येकाच्या आयुष्यातील शुभारंभाची पहिली घंटा वाजवतात,
आणि त्या क्षणाला पवित्रतेची दिशा देतात!
काही व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसतात,
ते असतात जीवनाशी जोडलेले अदृश्य धागे
आणि जंगम स्वामींची ही परंपरा म्हणजे
त्या धाग्यांचीच एक सुंदर, पवित्र, गुरुत्वाने उजळलेली विण…

गोरे सर
कोपरगाव
९८५० ६१३ ६१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *