सोमैया महाविद्यालयात पारंपारिक पद्धतीने शिवजयंती दिमाखदार उत्सवात साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“देशाचेच नव्हे तर अखिल विश्वाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त आपण मला निमंत्रित केलेत याचा मला मनस्वी आनंद आहे. मी आज पर्यंत असा आगळावेगळा आणि पारंपरिक स्वरूपातील अप्रतिम कार्यक्रम प्रथमच अनुभवतो आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनस्वी धन्यवाद देतो”, अशी प्रांजळ प्रतिक्रिया समारंभाचे प्रमुख अतिथी मा. अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अहिल्यानगर) यांनी येथे व्यक्त केली. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाच्या प्रसंगी श्री. भारती बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे तसेच को.ता. एज्यु. सोसायटीचे सदस्य मा. सुरेश शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा, मा. राजेश ठोळे, मा. सत्त्येन मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. डॉ. प्राचार्य विजय ठाणगे यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिवजयंतीनिमित्त उदंड शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भविष्यात देखील असेच दिमाखदार उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगत सहभागी विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन केले. या दिमाखदार समारंभाला संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत महाराजांच्या पालखीचे आगमन झाले, तदनंतर खास तयार केलेल्या मंचावर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या गीत मंचातील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना करून महाराजांचे पाळणा गीत सादर केले. त्यानंतर शिवराज्याभिषेक गीताचे गायन करण्यात आले. कुमारी वेदिका वल्टे हिने छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात लेझीम नृत्य सादर केले. राष्ट्रीय छात्रसेनेची कु. तलरेजा व गृपने लाठीकाठ्यांचे नेत्रदीपक संचालन केले. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लाठ्या-काठ्या व लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर हलगी व ताशाच्या तालावर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, मा. प्राचार्य, रजिस्ट्रार व प्राध्यापकांनीही सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या दरम्यान लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांच्या सहकार्याने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ग्रंथ-प्रदर्शनाचे मा. अमोल भारती यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथ-प्रदर्शनाचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या समारंभासाठी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी देखील फेटा, कुर्ता, नऊ वार साडी आदी पारंपारिक वेशभूषा धारण करून कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. या संपूर्ण भव्य-दिव्य अशा कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर समारंभाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे सदस्य डॉ. जिभाऊ मोरे व डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद तसेच सर्व सेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *