

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
जगामध्ये अर्धपोटी राहणार्यांची संख्या खूप मोठी आहे. या उलट उपहारगृहांमध्ये वाया जाणार्या अन्नाचे प्रमाण चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण शपथ घेऊया की मी माझ्या ताटातील अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. ताटात घेतलेले अन्न वाया जाऊ देणार नाही. या पृथ्वीवर राहणार्या सर्वांसाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ-2025 आणि जागतिक अन्न दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे होते. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणुन डॉ. सचिन नलावडे बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणुन तरुणांसाठीचे मार्गदर्शक तसेच इस्कॉनचे प्रचारक इंजि. सुरज थोरात उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गडगे व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन नलावडे पुढे म्हणाले की आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना लांबचा विचार करा चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न करा तरच यश तुमच्याकडे चालून येईल. फुलपाखरू ज्याप्रमाणे फुलातील फक्त मकरंदाचे सेवन करतात त्याप्रमाणे तुम्ही या जगातील फक्त चांगल्या गोष्टी आत्मसात करा. इंजि. सुरज थोरात यांनी यावेळी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी अंगी बाळगण्यासाठी करावे लागणार्या उपायांची माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की तुमच्यासोबत असलेले तुमचे मित्र, तुम्ही ऐकत असलेले संगीत, तुम्ही वाचत असलेली पुस्तके व तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहता यावरून तुमचे चरित्र कळते. यासाठी चांगले पहा, चांगले वाचा, चांगला विचार करा. वाईट सवयीपासून दूर राहा. यासाठी मूल्यशिक्षण महत्त्वाचे आहे. अध्यात्मिक पुस्तके आपल्याला जीवन चांगल्या प्रकारे कसे जगायचे याचे शिक्षण देतात. यासाठी अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करा. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तींकडून आशीर्वाद घ्या. ते आशीर्वादच तुमचे जीवन परिपूर्ण बनवतील.
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना डॉ. विक्रम कड म्हणाले की आजच्या जागतिक अन्न दिवसाची थीम उज्वल भविष्यासाठी व चांगले अन्न मिळविण्यासाठी हातात हात घालून प्रयत्न करूया अशी आहे. भूकबळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धा व पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत प्रथम क्रमांक तनुजा गुजवणे व द्वितीय क्रमांक विजेती वैष्णवी भरते, पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी शुभम गायकवाड, ऋषिकेश निकम, तन्मय चव्हाण, सार्थक राजपूत, सुजल कर्डिले यांचा तर द्वितीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थी अगुश बस्ते व वैष्णवी सुतार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार डॉ. महेश पाचारणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
