
कोपरगाव प्रतिनिधी:-
आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री.साईबाबा संस्थान शिर्डीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहुल जाधव यांची नियुक्ती झाली असून शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांच्या सहिनीशी हा आदेश आज काढण्यात आला आहे.
राहुल जाधव हे कर्तव्यदक्ष व खमक्या अधिकारी म्हणून सर्वदूर परिचित आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज ठिकाणी तहसीलदार म्हणून धडाकेबाज काम केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे त्यांची बदली झाली. कोपरगाव तालुक्यात राहुल जाधव यांच्या काळात वाळूतस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. नदीपात्रात स्वतः उतरून वाळू तस्करांच्या पाठीमाग धावून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करून वाळू तस्करांना पळता भुई करून सोडले होते.
‘सिंगम स्टाईल’ कामामुळे कोपरगाव तालुक्यात राहुल जाधव यांनी मोठा वचक निर्माण केला होता. अधिकारी व कर्मचारी यांना शिस्तीचे धडे देऊन एक आदर्श कार्य त्यांच्या कार्यकाळात केले. त्यानंतर अहमदनगर येथे प्रभारी पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यावेळी नगरच्या पुरवठा विभागाचे नाव काही गोष्टींमुळे खराब झाले असताना जाधव यांनी प्रभारी चार्ज ताब्यात घेऊन सुसूत्रता आणली.
त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन काम करून अडीच वर्षे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. जळगाव हा पहिला केरोसिन मुक्त होण्यासाठी विशेष योगदान राहुल जाधव यांनी दिले. त्याबद्दल त्यांचा गौरव तत्कालीन प्रधान सचिव श्री. पाठक यांनी केला होता.
अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मेळघाट व गडचिरोली भागात राहुल जाधव यांनी उपजिल्हाधिकारी या पदावर काम करत असताना आपल्या कामाचा अनोखा ठसा उमटविला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक मतदान प्रकियेसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील कारंजा येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना १०० टक्के मतदार यादी व संगणीकृत सातबारा यासाठी विशेष परिश्रम घेतले.
हुशार, कर्तव्यदक्ष व कडक अशी प्रतिमा असलेले राहुल जाधव यांची शिर्डी संस्थांनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल निश्चितच महसूलमधील कामाचा अनुभव संस्थांनच्या कार्यात उपयोगी आणून एक पारदर्शी कारभार राहुल जाधव करतील अशी अपेक्षा साई भक्तांतून व्यक्त होत आहे.
राहुल जाधव यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी या पदावर ३ वर्षाच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकान्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात ते शिर्डीत येऊन आपला पदभार घेणार आहेत.
