के.जे.सोमैया महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“सध्याच्या डिजिटल युगामुळे मोबाईल आदी बाह्य आकर्षणे वाढल्यामुळे तसेच समज कमी असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे प्राध्यापकांबरोबरच पालकांनी लक्ष ठेवण्याची कधी नव्हे ती गरज आज निर्माण झाली आहे. अन्यथा द्यिार्थ्यांची सर्वांगीण विकासामध्ये बाधा येऊ शकते व त्याचे भतिव्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे” असे प्रतिपादन को. ता. एज्यु. सोसायटीचे सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी यांनी केले. स्थानिक के. जे. सोमेया महाविद्यालयामध्ये आयोजित पालक मेळाव्याचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. या प्रसंगी श्री. मधुकर साबळे व प्रा. चंद्रशेखर जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी पुढे म्हणाले की, “पालक आपल्या पाल्याविषयी शालेय जीवनात जेवढे जागृत असतात तेवढे आपला पाल्य महाविद्यालयात गेल्यानंतर जागृत रहात नाही. खरे म्हणजे विद्यार्थी तरुण झाल्यानंतर ते बिघडण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी पालकांनी महाविद्यालय व आपल्या पाल्याच्या शिक्षकांशी सतत संपर्क ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात व प्रगती विषयी जाणून घेतले तर ते उपकारक ठरेलच शिवाय महाविद्यालयाचाही नावलौकिक वाढेल. आमचे महाविद्यालय सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असून त्या दिशेने अनेक उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत.” को.ता.एज्यु. सोसायटीचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे म्हणाले की,”पालकांनी उच्च शिक्षण व पदवीसोबतच आपल्या घरातुन मानवतेची शिकवण व संस्कार पाल्यावर करावेत. तरच खऱ्या अर्थाने परिपूर्ण नागरिक घडेल.” या प्रसंगी श्री.रवींद्र वाल्हेकर, संजय बोरनारे, बाळकृष्ण लावर, विजय बारहाते, सौ.करूणा देवकर, आदिनाथ ढाकणे, योगेंद्र मुळे इत्यादी पालकांनी आपल्या पाल्यांच्या अडचणी मांडल्या व महाविद्यालयाविषयी समाधान प्रकट केले.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.मधुकर साबळे म्हणाले की, “गेल्या २ वर्षात कोरोना काळात इतरत्र भरपूर शैक्षणिक नुकसान झाले परंतु सोमैया महाविद्यालयात नियमितपणे ऑनलाईन अध्यापन सुरु होते. याचे कारण या प्रांगणात कर्तृत्ववान शिक्षणमहर्षींची तिसरी पिढी कार्यरत आहे.” प्रा.चंद्रशेखर जोशी म्हणाले की “येथील उच्चशिक्षित व समर्पित स्टाफ, प्रयोगशाळा, संगणक प्रयॊगशाळा, जिमखाना, ग्रंथालय आदी. सुविधा सुसज्ज असल्यानेच या महाविद्यालयाला लागोपाठ २ वेळा नॅक संस्थेने A श्रेणी मिळाली आहे.” पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना प्राचार्य डॉ. बी.एस. यादव म्हणाले की, ” आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ग्रामीण भागातील असून सर्वसाधारण आर्थिक गटातील आहेत, त्याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजित करतो आणि चांगला नागरिक घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आपण आज आलात तसेच दरमहिन्यात एकदा महाविद्यालयात यावे आणि आपल्या पाल्याच्या अडीअडचणी सांगून आमच्याशी सुसंवाद ठेवावा अशी प्रांजळ अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सहकार्याच्या बळावरच आमचे ६ विद्यार्थी बेसबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालक मेळाव्याचे समन्वयक प्रा. डॉ. गणेश देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस.के.बनसोडे व डॉ.एस.बी.दवंगे यांनी केले व शेवटी प्रा. डॉ. बी.बी.भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास १०० पेक्षा अधिक पालक व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. पालक मेळाव्यानंतर ‘शिक्षक पालक भेट’ हा उपक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *