कोरोनावर मात करून ना. आशुतोष काळे जनसेवेत रुजू; कोळपेवाडी, सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनांना आणली ३४.१६ कोटी ची प्रशासकीय मंजुरी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही दिवसांपूर्वी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांना दुसऱ्यांदा कोरोनाने गाठल्यामुळे त्यांनी घरी राहूनच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून कोरोनावर मात केली. आणि कोरोनातून मुक्त होताच कोळपेवाडी, सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी आणून ना. आशुतोष काळे पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाले आहेत.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या होत्या. यापैकी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या सुरेगाव व कोळपेवाडी या गावातील पाणी पुरवठा योजनांचा देखील समावेश होता. या पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून ना. आशुतोष काळे यांचा सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून एक महिन्यापूर्वी या दोन्ही पाणी पुरवठा योजनांना महाविकास आघाडी सरकारने तांत्रिक मंजुरी दिली होती. मात्र तांत्रिक मंजुरीवर समाधान न मानता या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळून या योजनांचे काम तातडीने सुरु कसे होईल यासाठी ना. आशुतोष काळे यांचा आटापिटा सुरु होता. मात्र मागील आठवड्यात ना. आशुतोष काळे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव उपचार घेण्यासाठी घरी थांबावे लागले. मात्र जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या ना. आशुतोष काळेंना उपचारा दरम्यान मतदार संघातील विकास कामांना मंजुरी मिळविण्याची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती.
मात्र मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने व साईबाबांच्या कृपेने ज्यावेळी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेला वाहून घेत दाखल केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी मंत्रालय गाठत कोळपेवाडीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १८ कोटी ४६ लाख ८२ हजार व सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटी ६९ लाख २६ हजार अशा प्रकारे या दोन योजनांसाठी तब्बल ३४.१६ कोटी ची प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. त्यामुळे या दोन्ही पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजना कार्यान्वित होताच कोळपेवाडी, सुरेगाव च्या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण करण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. या दोन्ही गावातील महिलांची पाण्यासाठीची होणारी वणवण कायमची थांबणार असून महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार आहे. त्यामुळे कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे व सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी पिण्याच्या पाण्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोळपेवाडी, सुरेगाव पाणीपुरवठा योजनांना ३४.१६ कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *