हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी सीए.दत्तात्रय खेमनर यांचा ‘हेल्पिंग हँड्स’; – विद्यार्थ्यांना ७० लाखांची शैक्षणिक मदत…


कोपरगाव प्रतिनिधी:- -घरची आर्थिकपरिस्थिती कठीण, शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक क्षणाला संकटाचा सामना,संघर्ष ठरलेला,स्वतः गरीबीचे चटके सहन केले. मात्र आज स्वकर्तृत्वावर चार्टर्ड अकौंटंट असलेले दत्तात्रेय खेमनर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये, या उद्देशाने‘हेल्पिंग हँड्स’या संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देत त्यांच्या पाठीशी सन २०१०-११ पासून भक्कम उभे आहेत.
“हेल्पिंग हॅंड्स”या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १२ वीमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त मार्क असलेल्या गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २०२५ अखेर ७० लाख रुपयांची मदत केलेली आहे. या विद्यार्थांना हेल्पिंग हॅंड्स (मदतीचा हात) मिळत असल्याने ते उंच भरारी घेत आपल्या स्वप्नांना गवसणी घालत आहेत.


स्वतः गरिबीचे चटके सहन केलेल्या व्यक्तीला गरिबीचे दुःख अधिक चांगल्या प्रकारे समजते, याचा प्रत्यय सीए.दत्तात्रेय खेमनर यांच्या कार्यातून येत आहे.गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी होस्टेल अथवा मेस खर्च भागविण्यासाठी दरवर्षी प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. समाजातील दानशूर व्यक्तींनाही या उपक्रमाशी जोडून अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ दिले जात आहे. या मदतीचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, एमएस्सी. एमसीए, बी.फार्मसी,आयआयटी अभियंते बनले आहेत.विशेष म्हणजे, लाभ घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज स्वतः इतर गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे ‘हेल्पिंग हँड्स’ हा केवळ आर्थिक मदतीचा उपक्रम न राहता शिक्षणातून समाज परिवर्तन घडविणारी प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. एकेकाळी मदतीची गरज असलेले विद्यार्थी आज इतरांच्या शिक्षणासाठी आधारवड बनत आहेत.”आणि हा बहरलेला वटवृक्ष लावला आहे तो सीए.दत्तात्रेय खेमनर यांनी .त्यांच्या कार्याला सलाम.


कोट –समाजातील छोट्या व्यापारी, व्यक्तींना जास्त मदत करणे शक्य नसल्यास त्यांनी दिवसाला एक रुपया या प्रमाणे ३६५ रुपयांची मदत करावी. आपणा सर्वांच्या हेल्पिंग हॅंड्स (मदतीचे हात)मुळे हे कार्य करू शकलो आणि हे काम वयाची साठी पूर्ण झाली आहे तरीपण पुढे हि असेच चालू ठेवणार आहे. —-सीए .दत्त्तात्रेय खेमनर , संस्थापक “हेल्पिंग हॅंड्स” कोपरगाव.
