विद्यापीठाचे संशोधन व डिजिटल तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे ही आजची गरज:- संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
शेतीमध्ये ड्रोन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यासारख्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा गावागावात प्रसार करून ते प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतीची उत्पादकता, उत्पादनाची गुणवत्ता आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. मृदापरीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक कृषि तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, आयओटी सक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून कृषि साहित्य व निविष्ठा वाटप कार्यक्रम, संतुलित खत वापर जागरूकता कार्यक्रम-2026 आयोजन आणि ड्रोन प्रात्यक्षिक, पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल कदम उपस्थित होते. यावेळी मृद रसायनशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, ह.भ.प.डॉ. गणेश महाराज शास्त्री, भिलवडेचे सरपंच सौ. मिरा सुरेश बडे, उपसरपंच श्री. अमोल दादासाहेब बडे, स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. प्रमोद पोपळे, इंजि. किरण पवार आणि श्री .सुनील बडे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये माती परीक्षण व पिकांचा प्रतिसाद यांचा परस्पर संबंध या योजनेचे प्रमुख डॉ. आनंद जाधव यांनी माती परीक्षण, जमिनीचे आरोग्य व संतुलित खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुनिल कदम यांनी डिजिटल कृषि तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन व्यवस्था आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सविस्तर माहिती दिली. डॉ. गिरीशकुमार भणगे यांनी शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत भिलवडे येथील अनुसूचित जाती मधील 23 शेतकर्यांना कृषि साहित्य व निविष्ठांचे वितरण करण्यात आले. यामध्ये फुले लिक्विड मायक्रोग्रेड, फुले ट्रायकोडर्मा, फुले द्रवरूप स्फुरद, फुले मेटारायझियम, फुले रायझोबियम, फुले बायोपेस्टिसाइड, फुले बिव्हेरिया, लक्ष्मी विळा, खुरपी, आंबा झेला तसेच कृषिदर्शनी-2026 या प्रकाशनाचा समावेश होता. यानंतर शेतकर्यांच्या शेतावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद पोपळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंद बडे यांनी केले तर डॉ. शुभांगी घाडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंजि. शुभम सुपेकर, डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. नंदन तायडे, इंजि. तेजश्री नवले, इंजि. अभिषेक दातीर आणि इंजि. सौरभ भडांगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
