Uncategorized

विकृतीला कायद्याचा धाक बसला,नसरापूर नराधमाला फाशीची शिक्षा :- मा. आ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्यंत अमानुष अत्याचार करून जीवे मारणाऱ्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही.या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जलद गतीने दोन महिन्यात सुनावलेली फाशीची शिक्षा ही न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कायद्याचा निश्चित धाक बसवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली.

समाजासाठी घातक असणाऱ्या या प्रवृत्ती व ही राक्षसी वृत्ती निषेधार्य आहे.यामुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने स्वीकारलेली कठोर भूमिका, गुन्ह्यांचा वेगाने तपास, प्रभावी सरकारी बाजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अशा गंभीर प्रकरणांमध्ये न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश या निकालातून समाजात गेला आहे. कायद्याचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी आवश्यक आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली असून, समाजातही सुरक्षिततेचा विश्वास वाढेल.

मा.आ.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, महिलांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. सरकार, पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांनी समन्वयाने काम केल्यास अशा गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालता येईल. भविष्यात कोणत्याही विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने असा गुन्हा करण्यापूर्वी कायद्याच्या कठोर शिक्षेचा विचार करावा, असा धाक निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे व महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे अशा प्रवृत्ती व गुन्ह्यांविरोधातील लढा अधिक कठोरपणे सुरू राहील, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *