

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यात माजी सैनिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम चळवळ उभारणारे माजी सैनिक आर. बी. तथा आप्पा घोडके यांच्या १०६ व्या जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे आंबा व फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
माजी सैनिक संघटना व माजी सैनिक आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण, कोपरगांव वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी सैनिक आर. बी. तथा आप्पा घोडके यांच्या थोरल्या कन्या रजनीताई नलगे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांचे शुभहस्ते फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त सुभेदार मारुतीराव कोपरे, हवालदार विजय वाघ, प्रकाश घोडके, सुरेश घोडके, दिलीप घोडके, सुशांत घोडके, वसतिगृह अधिक्षक प्रशांत आहेर यांचेसह वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, सेवानिवृत्त सुभेदार मारुतीराव कोपरे यांनी, लष्करातील उत्कृष्ट सेवेतील निवृत्ती नंतर कोपरगांव नगरपरिषदेचे पहिले आपत्ती व्यवस्थापन प्रमुख केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच त्यांच्या शिस्त, प्रामाणिक आणि राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सुशांत घोडके यांनी तर आभार आर्यन घोडके यांनी केले. वसतिगृह विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
माजी सैनिक कै. आर.बी. तथा आप्पा घोडके यांची माहिती…
माजी सैनिक कै. आर. बी. (रामलिंग बाळाप्पा) तथा आप्पा घोडके यांची २० एप्रिल १९२० जयंती..
आप्पांचे खापर पणजोबा शिवलिंग घोडके यांचा १७६८ साली बेट- कोपरगांवात गावगाड्यातील जुन्या जाणत्यांमध्ये बोलबाला होता. आप्पा सर्व भावंडांपैकी सर्वात धाकटे होते. कोपरगांव येथे १ नंबर शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे जुने इंग्रजी ५ वी आणि मराठी ७ वी पर्यंत शिक्षण झाले. बालपणापासून खडतर आणि संघर्षमय प्रवास आप्पांनी बघितला. तारुण्यात सैन्यदलात भरती झाले.
भारतीय सैन्यदलात ‘हवालदार’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आसाम, ब्रम्हदेश, मणिपूर, अजमेर सह भारतात अनेक ठिकाणी लष्करी सैन्यातळासोबत विशेष मोहिमेत नियुक्ती होती. त्यांचे चमकदार कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना तीन स्टार देवून गौरव केला होता.
लष्करी कार्यकाल संपल्यावर १९४८ साली कोपरगांव येथे आपल्या मुळ गावी परत आले. तेव्हा कोपरगांव नगरपालिकेची स्थापना होवून वर्षही लोटले नव्हते. तत्कालीन पहिल्या नगराध्यक्षा शकुंतलाबाई बोर्ड यांना कोपरगांव नगरपालिका करिता अग्निशमन, रुग्णवाहिका, रोडरोलर अशी जन सुविधा देण्यासाठी वाहने खरेदी करायची होती. त्याकाळी चारचाकी मोठी वाहने चालवणारे अत्यंत नगण्य लोक होती. त्यांना ही सर्व वाहने चालवणारा अष्टपैलू हिरा पाहिजे होता. त्यांना सेवानिवृत्त सैनिक आप्पांच्या रुपाने मिळाला. नगराध्यक्षा शकुंतलाबाई बोर्डे यांनी सेवानिवृत्त सैनिक आप्पा घोडके यांना, “कोपरगांव म्युनिसिपालिटी (नगरपालिका) ची वाहन चालक म्हणून सेवेत रुजू व्हा. आपल्या सारख्यांची कोपरगांव नगरपालिकेला गरज आहे.” असे सांगितले. आप्पा सेवेत रुजू झाले. यानंतर कोपरगाव नगरपालिकेची पहिली अग्निशमन, रुग्णवाहिका, रोडरोलर यासह सर्व वाहने आप्पांनी आणली होती.
दैनंदिन सेवेसह संकटकाळी सेवा देतांना सैनिकी कार्य पद्धतीमुळे कोपरगांवचा सर्व आपत्कालीन कारभार त्यांचेकडे आला. पहाटे चार पासून ते रात्री अपरात्री उशीरापर्यंत कोपरगांवकरांच्या सेवेत सदैव तत्पर आप्पांनी झोकून सेवा दिली. अशा प्रसंगी आपल्या ड्युटी व्यतिरिक्त रात्री-अपरात्री अत्यावस्थ रुग्णांना मुंबई, पुणे येथे नेतांना आप्पांनी कधीही सबब सांगितली नाही.
सन १९६२ मध्ये पुण्याचे पानशेत धरण फुटले तेव्हा आप्पा कोपरगांव नगरपालिकेत आपत्कालीन विभागाचे प्रमुख होते. आप्पांना तातडीने पुण्यात बोलावणे धाडले. आप्पांचे घरी पत्नी सौ. सुमतीबाई आणि मुले लहान होती. परिस्थिती बेताचीच परंतू कर्तव्यनिष्ठ आप्पा क्षणाचा विलंब न करता पुण्यात दाखल झाले. पुण्यातील हे संकट पाहून त्यांच्यातील लष्करी शिपाई जागा झाला. आपत्कालीन परिस्थितीचे निवारण करणा-या महाराष्ट्रातील महत्वाच्या पथका सोबत एक महिना शेकडो जीव वाचवण्यासाठी ज्यांनी शर्थ केली. त्यांचा तत्कालीन कलेक्टर आणि महापौर यांनी गौरव केला. आप्पांच्या सेवत प्रामाणिक आणि वक्तशीरपणा होता. त्यामुळे सीओ (मुख्याधिकारी) असो कि, प्रेसिडेंट (नगराध्यक्ष) त्यांचा आदरभाव करत असत. मुंबई मंत्रालयात कोपरगांव नगरपालिकेचे दप्तरी कामकाज घेऊन जाण्याचे काम फक्त आप्पाच करत असे. एवढा विश्वास तत्कालीन प्रेसिडेंट, सीओ आणि नगरसेवक यांचा यांच होता. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे कडून कोपरगांव नगरपालिके करिता अनेक अनुदाने मंजूर करुन आणली.
पुर्वी शिर्डी हे कोपरगांव तालुक्यातील असल्याने श्रीरामनवमी सह सर्व उत्सवाला कोपरगांव नगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याचे स्वतः टैंकर असत. सलग तीन दिवस आप्पा पाण्याचे टेंकर चालवत नेत असे. सैनिकी बाणा, स्पष्टपणा, शिस्तबद्ध वागणूक आणि निर्मळ सेवार्थ मन आप्पांच्या ठायी होते.
माजी सैनिकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारे कोपरगांवातील पहिले व्यक्ती होते. त्यानंतर माजी सैनिक संघटनेचा उदय झाला. आप्पा एक जनमाणसांचा गोतावळा जमवणारे उत्कृष्ट संघटक होते. त्यांना नोकरीत मिळणारा पगार आणि सेवानिवृत्त झाले नंतरही मिळणारी पेन्शन मधील निम्मा हिस्सा दान धर्म आणि माजी सैनिक, कोपरगांव नगरपालिका कर्मचारी आणि गोरगरीब जनसामान्यांच्या मदतीसाठी खर्च केला. अनेकदा संबंधित अधिकारी यांना जनसामान्यांच्या प्रश्नावर मुद्देसुद, निडरपणे खड्या आवाजात आप्पा जाब विचारत. असे अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले.
आप्पा धार्मिक होते. परखड, स्पष्ट बोलणारे परंतू मनातून तेवढेच हळवे होते. सर्व जाती-धर्माला आपले वाटायचे. शिवशंकार सह इतरही देव साधू-संत यांचे भक्तीत रमायचे. कोकमठाणचे संत रामदासी बाबा, फक्कड बाबा आणि फौजदार बाबा यांना सोबत घेऊन त्यांनी काशी सह तीर्थ यात्रा केली होती. शंकर महाराज यांनी त्यांना दृष्टांत दिल्याचे महाराजांचे पुस्तकात आहे. संत गुलाबबाबा यांचे ते भक्त होते.
राष्ट्रविचाराने भारावलेल्या आप्पांनी इतरांच्या बाबतीत कधीही पंगतीत भेद केला नाही. आप्पांच्या नंतर घोडके परिवार आणि त्यांचे सहकारी यांनी माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, कोपरगांव वतीने त्यांचे विचाराचे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले असून आजही राबवित आहे.
संकलन : माजी सैनिक कै. आर.बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण, कोपरगांव.
