कोपरगावच्या चिमुकल्यांनी अनुभवले ‘विमानाचे उड्डाण’. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलची शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:<
विमानतळ व्यवस्थापन, धावपट्टीचे तंत्र आणि देशाच्या सुरक्षेचा धडा; शिर्डी विमानतळ प्राधिकरणाकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक
कोपरगाव (प्रतिनिधी):
पुस्तकातील विमानाची चित्रे पाहणाऱ्या कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्षात विमानाचे टेक-ऑफ आणि लँडिंग अनुभवले. कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (काकडी) शैक्षणिक भेट दिली. विमानतळ प्राधिकरणाने या भेटीला विशेष परवानगी दिली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विमानतळाच्या अंतर्गत कामकाजाची सखोल माहिती घेता आली.
विमानतळ व्यवस्थापनाचे मिळाले ‘लाईव्ह’ दर्शन: संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या नेतृत्वाखाली व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून ही भेट आयोजित करण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना विमानतळावरील विविध विभागांची माहिती देण्यात आली.
यामध्ये प्रवेश आणि तिकीट प्रक्रिया: प्रवाशांचे तिकीट चेकिंग आणि बोर्डिंग पासची प्रक्रिया कशी चालते.

बॅगेज चेकिंग: प्रवाशांच्या सामानाची अद्ययावत यंत्रणेद्वारे होणारी तपासणी.

अरायव्हल आणि डिपार्चर: विमानतळावर येणारे आणि जाणारे प्रवासी यांचे नियोजन कसे केले जाते.

धावपट्टीचे तंत्र आणि विमानाचे उड्डाण
विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती म्हणजे धावपट्टी रानवे (Runway). विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ होतानाचे दृश्य विद्यार्थ्यांनी अत्यंत जवळून अनुभवले. विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीचे व्यवस्थापन आणि विमानांच्या सिग्नल यंत्रणेबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

सीआयएसएफ (CISF) जवानांकडून सुरक्षेचे धडे: देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय सुरक्षा दलांचे महत्त्व, शिस्त आणि विमानतळाची चोख सुरक्षा व्यवस्था याबद्दल जवानांनी दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

भविष्यातील संधींवर मार्गदर्शन
केवळ विमान पाहणेच नव्हे, तर विमानचालन एवीएशन(Aviation) क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, वैमानिक (Pilot), एअर होस्टेस आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर कसे होता येते, याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या यशस्वी भेटीबद्दल संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे पाटील,कार्यकारी संचालक विशाल झावरे, मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले आहेत. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून, त्यांच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *