वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण ,ऋराहुल (दादा) ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथे भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच तहानलेल्या वाटसरूंसाठी पाण्याचा आधार देणाऱ्या पाणपोईचा शुभारंभ रविवारी (दि.8) करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ यांच्या वतीने भरतवाडी परिसरात सलग तिसऱ्या वर्षी या मोफत पाणपोईची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, समाजाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करून स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान करण्यात आला.
भरतवाडी परिसरातील श्री रोकडोबाबा व श्री गवळी बाबा देवस्थानच्या पवित्र प्रांगणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी गावातील ज्येष्ठ समाजसेविका स्मिता काबरा, समर्पित अंगणवाडी सेविका अलका मेहरे, सारिका भड, विशाखा भालेराव, तारामती टेके व वृषाली टेके, तसेच आरोग्यदूत आशा सेविका सुषमा कपाटे, रोहिणी लोखंडे, योगिता पवार, शितल गायकवाड, सविता वाघ, रंजना भड व सुषमा वाघ यांचा त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला. राहुल (दादा) मित्र मंडळातील महिला स्वयंसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
राहुल (दादा) टेके पाटील ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. उन्हाळ्यात वारी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांची, शाळकरी मुलांची व मजुरांची तहान भागावी, या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून ही पाणपोई अखंडपणे सुरू ठेवली जात आहे. केवळ उपक्रम न राबवता समाजातील तळागाळातील महिलांच्या कष्टाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी ट्रस्ट व राहुल दादा मित्र मंडळाच्या स्वयंसेवकासह वारी परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कडक उन्हात सुरू झालेल्या या सेवेमुळे वारी परिसरात सध्या समाधानाचे वातावरण असून ट्रस्टच्या या सामाजिक बांधीलकीची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *