एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना :- आ.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगावात ‘एक्स्पो २०२६’ चे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- दरवर्षी एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगावकरांना नवीन काय देता येईल आणि त्याचा कोपरगाव आणि तालुक्याला कसा फायदा होईल याचा प्रयत्न सातत्याने मागील १३ वर्षापासून होत असून एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे लायन्स, लिनेस, लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे उद्योगसमूह प्रायोजित ‘एक्स्पो-२०२६’ चे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटून रस्त्यांच्या झालेला विकास व शहर सुशोभीकरणाबरोबरच झालेल्या इतरही विकासकामांमुळे अहिल्यानगर शहरानंतर सर्वात जास्त जमीन खरेदी-विक्री रजिस्ट्रेशन कोपरगाव शहरात होत आहे हे प्रगतीचे लक्षण असून कोपरगाव शहरात झालेल्या विकासकामांमुळे हे होत आहे. आपले कोपरगाव शहर हे असं शहर आहे या शहराला जोडणारा समृद्धी महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग आहे, मुख्य रेल्वे लाईन असलेले रेल्वे स्टेशन आहे आणि आपल्या तालुक्यात विमानतळ देखील आहे. तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्याला जेवढे पर्यटक येत नाही त्यापेक्षा जास्त देश विदेशातून भाविक शिर्डीला येतात असे जगविख्यात प्रसिद्ध श्री साईबाबा देवस्थान आपल्या अगदी जवळ आहे त्याचा फायदा निश्चितपणे कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थकारण वाढीला होतो.त्याप्रमाणेच एक्स्पो देखील कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थकारण वाढीसाठी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे पदाधिकारी व सदस्य, क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *