इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत कोपरगावच्या ‘संत ज्ञानेश्वर स्कूल’ची ‘पुणे-सिंहगड’ ऐतिहासिक सफर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: पुस्तकात वाचलेला इतिहास जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा तो काळजावर कोरला जातो. याचाच प्रत्यय कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. निमित्त होते शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऐतिहासिक आणि शैक्षणिक सहलीचे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत, विद्यार्थ्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’च्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यासह पुण्याच्या विविध वैभवशाली वारसा स्थळांना भेट दिली.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक मा.श्री. विशालजी झावरे यांच्या नेतृत्वाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
सिंहगडावर घुमला शौर्याचा जयघोष: सहलीची सुरुवात सिंहगडाच्या चढाईने झाली. इयत्ता ३ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात गड सर केला. गडावरील तानाजी मालुसरे यांचे स्मारक, नरवीर तानाजी कडा, तोफखाना, कल्याण दरवाजा आणि छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी या ठिकाणी नतमस्तक होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान दिसत होता. शिक्षकांनी गडाचा इतिहास सांगितल्यामुळे तानाजी मालुसरे यांचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर जिवंत झाला. गडावर मिळणाऱ्या पारंपारिक ‘पिठलं-भाकरी’चा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक सहलीची रंगत वाढवली.

चौकट: सांघिक भावनेचे बाळकडू: या उपक्रमाबद्दल बोलताना कार्यकारी संचालक विशाल झावरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी कीडा न बनवता त्यांच्यात साहसी वृत्ती आणि आपल्या गौरवशाली इतिहासाप्रती आदर निर्माण व्हावा, हाच या सहलीचा मुख्य उद्देश होता. गड-किल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेतली आहे.”

भक्ती, शक्ती आणि विज्ञानाचा त्रिवेणी संगम: केवळ गडच नव्हे, तर या सहलीतून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या विविध पैलूंचे दर्शन घेतले.

अध्यात्म: देहू आणि आळंदी येथे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी विद्यार्थ्यांनी नमन केले.

शौर्याची प्रचिती: मोशी येथील १८० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा, तुळापूर येथील समाधी स्थळ आणि शनिवारवाडा येथे विद्यार्थ्यांनी शिवकाळाचा इतिहास अनुभवला.

विज्ञान आणि श्रद्धा: पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विज्ञानाचे प्रयोग अनुभवले, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिर व रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन आध्यात्मिक ऊर्जा मिळवली.
अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडलेल्या या सहलीसाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. इतिहासाची ही शिदोरी घेऊन आनंदी चेहऱ्याने विद्यार्थी कोपरगावात परतले, तेव्हा पालकांनीही या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *