महात्मा फुले कृषी विद्यापीठात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे म्हणाले की इंग्रजांच्या राजवटीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत प्रत्येक जण इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर लढा देत होता. अशा परिस्थितीमध्ये बकीमचंद्र चटर्जी यांनी अक्षय नवमीला दि.7 नोव्हेंबर, 1875 रोजी वंदे मातरम हे गीत लिहिले. स्वातंत्र्य चळवळीत वंदे मातरम कोट्यावधी भारतीयांचा युद्धघोष बनले.अशाप्रकारे भारतीय जनतेला प्रेरणा देण्यातील त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या गीताच्या लेखनाला दीडशे वर्ष पूर्ण झाली असून या गीतामध्ये त्यांनी मातृभूमीचे सुंदर वर्णन केले आहे. या गीतातूनच प्रत्येक देश वासियाला देश प्रेमाचे बळ मिळाले असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. आनंद चवई यांनी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार चार टप्प्यात कार्यवाही करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधीची माहिती दिली.
क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी यांनी आभार मानले. याप्रसंगी कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, दोन्ही महाविद्यालयांचे सहाय्यक कुलसचिव, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी तसेच पदव्युत्तर व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *