कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात दीक्षारंभ व अभियंता दिवस साजरा ;कृषि अभियांत्रिकी विषयातील विविध संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आपण प्रवेश घेतला आहे. येथे शिक्षण घेत असतांना स्वतःला ओळखा, भविष्यात काय करायचे आहे ते ठरवा ते पूर्ण करण्यासाठी सर्मपन करा. कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर विविध क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी अधिक जागृत राहून अभियांत्रिकीच्या विषयांबरोबरच विविध संधीचा फायदा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांकित्री महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दीक्षारंभ व अभियंता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सचिन नलावडे बोलत होते. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील किसान कार्पोरेशन या कंपनीचे प्रमुख शैलेंद्र अडसुरे उपस्थित होते. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास कांबळे, अक्षय उर्जा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. वीरेंद्र बारई, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गडगे, कृषि अवजारे व यंत्रे प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे व सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
डॉ. सचिन नलावडे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे संशोधन करुन दाखवा. आज अभियंता दिवस आहे आणि आपण सर्वांनी या क्षेत्रात पदार्पन केले आहे. श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणुन साजरा करतो. यावेळी प्रमुख पाहुणे शैलेंद्र अडसुरे म्हणाले की तुम्हाला पुढे काय करायचे आहे हे स्वतः ठरवा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आवड आहे तेच क्षेत्र करियरसाठी निवडा. त्यासाठी कठोर मेहनत करा. तुमच्या आयुष्यातील ठराविक काळच तुम्हाला खुप मेहनत करावी लागेल परंतु त्याला कोणताही पर्याय नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारचे करिअर निवडावे यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. विक्रम कड, डॉ. कैलास कांबळे, डॉ. वीरेंद्र बारई, डॉ. शैलेंद्र गडगे व डॉ. प्रविण कदम यांनी आपल्या विभागासंबंधीची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दीक्षारंभ कार्यक्रम व अभियंता दिवसाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच त्यांचे पालक यांचे गुलाब पुष्प देवून मान्यवरांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार डॉ. महेश पाचारणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *