
प्रवरा बँकेच्या विळदघाट शाखेचे उद्घाटन…
कोपरगाव प्रतिनिधी
(अहिल्यानगर):- सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रवरा सहकारी बँकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. विळदघाट येथे नव्याने सुरू झालेली बँकेची शाखा अहिल्यानगरच्या औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण भागीदारी करेल, असा विश्वास जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवरा सहकारी बँकेच्या विळदघाट येथील नव्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी सौ. शालिनी विखे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे, वसंतराव कापरे, बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिद्र थेटे, सीईओ सौरभ बालोटे, संचालक मंडळातील सदस्य तसेच पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, डॉ. पांडुरंग पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी दूरदृष्टीने प्रवरा सहकारी बँकेची स्थापना केली. समाजातील कमी उत्पन्न गटाला विविध कर्ज योजनांद्वारे आधार देत बँकेने पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून आज सुमारे १४०० कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा गाठला आहे.
विळदघाट शाखा अहिल्यानगरच्या व्यापारी, उद्योजक व छोट्या व्यावसायिकांसाठी आधार ठरेल. अहिल्यानगरच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राला समृद्ध परंपरा लाभली आहे. नागापूर औद्योगिक वसाहतीच्या अगदी जवळ ही शाखा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसाठी दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे विश्वासार्ह ठिकाण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन ग्राहकांच्या व उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रवरा बँकेच्या वतीने लवकरच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले.
