
बडदे कुटुंबातील तीन सख्ख्या भावांना आणीबाणीत १९ महिणे तुरुंगात बंदिवान ठेवल्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण…
आणीबाणी घटनेला ५० वर्षे पूर्ण…
(२५ जून १९७५ ते २५ जून २०२५)
कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रहित विचार ऐकणे सोपे असते. मात्र राष्ट्रहित विचार अंगीकारुन एका विशिष्ट विचारधारेशी समरस होवून ध्येयाने पेटून उठणे कठीण असते. असे व्यक्तीमत्व सार्वजनिक जीवनात नेतृत्व मानले जाते. धान्याचं एखादं बी स्वतःला जमिनीत गाडून घेतं तेव्हा कुठे शेकडो दाण्याचे कणीस उगम पावते. कोपरगांव तालुक्यातील मळेगांव थडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठेने जोडलेला बडदे परिवार त्यापैकी एक मानला जातो. आणिबाणीत १९ महिणे कृष्णराव, उत्तमराव आणि भिमराव बडदे ही तीन सख्खी भावंड नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९ महिणे बंदिवान होती. या घटनेने त्यांचा शेती व्यवसाय आणि बडदे परिवार उध्वस्त झाला होता. तीन सख्खे भावंड दीड वर्षापेक्षा अधिक काळ जेल मध्ये डांबणे म्हणजे त्या कुटुंबात कर्ता माणुस शिल्लक ठेवायचा नाही. महाराष्ट्र राज्यातील हे आणीबाणीतील निर्दयीपणाचे एक उदाहरण म्हणावे लागेल.
२५ जून २०२५ रोजी देशव्यापी आणीबाणीला ५० वर्ष पुर्ण होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी कारावास भोगलेल्याविषयी संवेदना व्यक्त करत “राजबंदी” संबोधले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २५ जून दिवस “संविधान हत्या दिवस” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदिवान आणि त्यांचा वारसांच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे.
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर स्थान टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्नशील होत्या. मात्र देशांतर्गत लोकशाही तत्वांचा -हास होत चालला होता. न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप, मानव अधिकाराचे उल्लंघन, वृत्तपत्रे माध्यमांवर बंदी अशा अनेक घटना एकामागून एक सरकारकडून होत होत्या. अशा घटनांविरुध्द जनता एकवटण्यास सुरुवात झाली होती. जनक्षोभ वाढला तर आपले पंतप्रधान पदाला धोका निर्माण होवू शकतो. ही जाणीव झाल्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.
२५ जून १९७५ पासून आणिबाणी देशात लागू झाली. इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करुन देशाची सर्व सुत्रे हाती घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल यासह अनेक लोक चळवळीतील नागरिक रस्त्यावर उतरले…”आणिबाणी रद्द करा”…”संघ बंदी उठलीच पाहिजे”… “नसबंदी कें तिन दलाल, इंदिरा…संजय…बन्सीलाल”… अशा घोषणा देशभर दिल्या जात होत्या.
अहिल्यानगर (जुना अहमदनगर) जिल्हा कम्युनिस्टांचा मानला जात असे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माध्यमातून अण्णासाहेब बागूल, बाबासाहेब पुरंदरे यांनी माणसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली. यात कृष्णराव, उत्तमराव आणि भिमराव बडदे ही भावंड संघ विचाराने जोडली गेली.
कोपरगांव तालुक्यातील मळेगांव थडी येथील विष्णुजी यशवंतराव बडदे यांचा शेती सोबत गुळाच्या गु-हाळांचा व्यवसाय होता. स्व. कृष्णराव बडदे हे त्यांचे थोरले सुपुत्र होते. जुनी ११ वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले होते. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते घडले. शेती हा व्यवसाय आवडीने सांभाळत. भारतीय जनसंघाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे ते पहिले जिल्हाध्यक्ष होते. देशात आणीबाणीला विरोध करणा-याचे अटक सत्र सुरु झाले होते. एकादशीचा दिवस आणि कृष्णराव यांना उपवास होता. शेतात नांगरणीचे काम करत होते. पोलीस तेथे पोहोचले अन् शेतावरुन थेट पोलीस स्टेशन ते नाशिक मध्यवर्ती कारागृहात मिसाबंदिवान म्हणुन कैद केले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर कृष्णराव पुन्हा शेती व्यवसाय सुरू केला. मळेगांव थडी गांवचे जनसंघाचे पहिले सरपंच म्हणून सलग तीन वेळा म्हणजे १५ वर्षे काम पाहिले. शेतक-यांसाठी शिवशंकर सोसायटीची स्थापना केली. बडदे वस्तीवर जागा देवून शेतकरी आणि मजूरांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळा सुरु केली. कोपरगांव पंचक्रोशीतील अनेक लोक त्यांची अडली-नडली कामे कृष्णराव यांचेकडे घेवून यायचे तेव्हा कोणालाही निर्मुखी परत पाठवत नसे. दोन-तीनशे लोकांची रोजची पंगत बडदे वस्तीवर असायची. जुन्या काळातील बुलेटवर फिरणारे कृष्णराव आजही अनेकांना आठवतात. ९ एप्रिल २००८ साली त्यांचे येवला येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना “भाऊ” या टोपणनावाने संबोधले जात असे.
कृष्णराव यांचे धाकले बंधू स्व.उत्तमराव जुनी १० वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ६ जुलै १९४४ रोजी झाला. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते घडले. मोठ्या भावाला शेतीत हातभार लावत. देशात आणीबाणीला विरोध करणा-यांचे अटक सत्र सुरु झाले होते. उत्तमराव यांना अटक होवून नाशिक मध्यवर्ती कारागृहात मिसाबंदिवान म्हणुन कैदी केले. कारागृहात त्यांचा प्रसिद्ध ज्योतिष आणि पंचांगशास्राचे दाते यांचेशी संपर्क आला. त्यांना ज्योतिष आणि पंचांग याचे ज्ञान मिळाले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर उत्तमराव वारकरी संप्रदायात रमले. भगवान दत्तात्रेय यांचेवर त्यांची निस्सीम भक्ती होती. अध्यात्मिक वाचनाचे जोरावर त्यांनी कोपरगांव तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रवचन, मार्गदर्शन केले. त्यांना बालयोगी ओतूरकर महाराज यांचा सहवास लाभला. उत्तमराव पंचक्रोशीत ह.भ.प.म्हणून ओळखले जावू लागले. तसेच आयुर्वेदाची माहिती असल्याने अनेकांना आयुर्वेद उपचार दिले. स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर, कुडता, डोक्यावर केशरी वारकरी फेटा बांधलेले ह.भ.प. उत्तमराव महाराज बडदे त्यांचा गोड आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली. दत्तजयंती तिथीला ११ डिसेंबर २०१९ त्यांनी देह ठेवला. कुटुंबासह आप्त स्वकियात “तात्या” टोपणनावाने ओळखले जात असे.
कृष्णराव यांचे धाकटे बंधू भिमराव यांचा १ ऑगस्ट १९४७ हा जन्मदिवस. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले भिमराव हे तृतीय वर्ष शिक्षित होते. त्यांना वाचन, वक्तृत्व आणि व्यायामाची प्रचंड आवड होती. पुणे येथील फर्ग्युसन कॅालेज मध्ये पदवीधर शिक्षण घेत असतांना, संघाचे काम करायला काही मर्यादा येत होत्या. त्यावेळी त्यांनी पतित पावन संघटनेची स्थापना केली. गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन हे पतित पावन संघटनेचे सदस्य होते व भिमराव यांच्या नेतृत्वात जोमाने काम करत होते.
भिमरावांच्या आक्रमक कार्यशैली चा संबंध पुण्यात दरारा निर्माण झाला. पुणे विद्यापिठाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना “डिलीट” ची पदवी देण्याची घोषणा करून त्यांचा समारंभ घोषित केला. भिमराव यांनी हजारो तरूण विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्या समारंभाला विरोध करत एक आक्रमक आंदोलन उभे केले. तो समारंभ अक्षरशः उधळून लावला. त्या दिवसापासून पुणे येथील पोलीस अधिकाऱ्यांना भिमरावांचा कार्याचा दरारा परिचीत झाला. पुढे भिमराव हे विधीज्ञ झाल्यावर कोपरगांव येथे विविध लोकचळवळीची आंदोलनात अग्रेसर रहायचे. पुण्यातील पतित पावन संघटनेचा दरारा संपुर्ण महाराष्ट्र पहात होता. त्यामुळे भिमराव जनसामान्यांचे उत्तम संघटक झाले.
१९७५ च्या आणीबाणी विरोधात भिमराव यांनी आंदोलन छेडले. जनसामान्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही पद्धतीने सबंध देशावर आणीबाणी लादून, ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली, त्या जुलमी, हुकूमशाही राजवटीच्या विरोधात, चिड निर्माण होईल, अशी ज्वाजल्य आक्रमक भाषणे करून, त्याची प्रसिद्धी गावातील भिंती चुना आणि गेरुने रंगविल्या. तत्कालीन पोलीस अधिकारी यांना भिमराव बडदे यांचा दरारा असल्याने त्यांना पकडणे शक्य नव्हते. अशा प्रसंगी त्यांचे सहकारी यांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. तेव्हा आपल्या जीवाभावाच्या माणसांचा पोलीस छळ करतील. अशी भावना मनाशी येवून त्यांनी स्वतः पोलीसांना आत्मसमर्पण केले.
त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात झाली. १९ महिन्यांच्या मिसा बंदिवासात घाबरुन न जात त्यांचे सहकारी यांनी निर्भीडपणे दिनचर्या सुरु केली. जेल मध्ये मुख्यशिक्षक म्हणून शाखा लावायला सुरूवात केली. तत्कालीन प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांचे आज्ञा नुसार प्रभात शाखेत भिमराव सर्वांकडून व्यायाम करुन घेत. एका दमात एक हजार सूर्यनमस्कार घालण्याचा पराक्रम भिमराव यांनी कारागृहात केला होता. विशेष बाब म्हणजे कारागृहातील जेवणाची थाळी, भाजीचे पातीले, चमचा आणि उपलब्ध साहित्याचा सदुपयोग करुन बंदिवान यांनी उत्तम घोष (बॅन्ड) कारागृहात तयार केला होता. देशभक्ती, स्फूर्ती गिताला घोषाची संगीत साथ असायची.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी टोकाची भुमीका घेऊन ही वेळ देशावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांवर आणली. हे शल्य प्रत्येकाच्या मनात बोचत होते. इंदिरा गांधी यांची प्रतिकात्मक अंत यात्रा तुरुंगात काढण्याचे धाडस भिमरावांनी केले…अंत यात्रेसाठी लागणारी साहित्य कारागृहाच्या अंतर्गत प्रतिकात्मक जमवाजमव केली. इंदिरा गांधींची प्रतिकात्मक अंतयात्रा तीही कारागृहात करायची…कारागृहाच्या पटांगणात एक फेरा मारायचे ठरले. सर्वात पुढे कोण चालणार हा विषय पुढे आला. भिमराव प्रतिकात्मक शिकळ घेऊन पुढे ठाकले. काही अंतर चालल्यावर प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांनी कारागृहाच्या खोलीतून काय प्रकार चाललायं असा कटाक्ष टाकला. लक्षभेदी कटाक्ष आणि क्रोधित मुद्रेने बाबाराव भिडे कडाडले, “हे आपले संस्कार नाहीत.” प्रतिकात्मक अंत यात्रेला सर्वांना विराम दिला. अशा प्रकारे भिमराव स्वयंसेवक बंदिवानांच्या घुसमटीला वाट करुन देत असत.
भिमरावांनी बंदिवासातून २१ मार्च १९७७ रोजी सुटल्यावर कोपरगांव येथे नव्या दमाने वकीली व्यवसाय, पुढे जनसंघ,भारतीय जनता पक्षाचे सक्रिय काम करतांना जनतेच्या आग्रहखातर १९९६ सालच्या लोकसभा निवडणूकीत कोपरगांव लोकसभा मतदारसंघातून विजयी होवून “खासदार” झाले. अयोध्या रामजन्मभूमी मुक्ती लढ्यात त्यांचा सक्रिय व आक्रमक सहभाग राहिला. शेतकरी, उस उत्पादक यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भिमरावांची सहकारी कारखानदार यांना सतत भिती वाटत असे. जनसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भिमराव बडदे यांनी २७ एप्रिल २००३ रोजी आपला देह ठेवला.
जनसामान्य भिमरावांना आपुलकीने “नाना” या टोपण नावाने संबोधत. जनतेसाठी अहोरात्र सतत उपलब्ध असणाऱ्या भिमराव नानांची आठवण आणि दरारा सांगणारे आजही कोपरगांव, अहिल्यानगर जिल्हा, पुणे येथे असंख्य स्वयंसेवक आहेत.
नाशिक मध्यवर्ती कारागृहात भिमराव बडदे दोन्ही सख्ख्या भावंडासोबत इतरांना आधार द्यायचे. एकाकी आलेल्या अनेक कैद्यांना एकटेपणा १९ महिने जाणवू दिला नाही. बडदे कुटुंबातील भिमराव बडदे आणि दोन भावंड हे तुरुंगात मिसा बंदिवान राहिल्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. आणीबाणीने अनेक कुटुंब देशोधडीला लागले. ही इतिहासातील घटना मनाला आजही अस्वस्थ करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, समाजवादी कार्यकर्ते म्हणून मिसा कायद्याअंतर्गत जेल मध्ये १९ महिने टाकले. हा तेव्हाचा निर्दयीपणाच म्हणावा लागेल. त्या कठिण काळातही तुरुंगात आंदोलन करणारे बडदेंसारखे झुंजार कार्यकर्ते होते. आज केंद्र आणि राज्यात स्थिरावलेल्या सरकारने आणीबाणीतील राजबंदी आणि त्यांच्या कुटुंबाची जाण ठेवली. अनेक कुटुंबाचे यात समर्पण आहे. आज राजसत्तेच्या काळात या विचारधारेशी अनेक नव्याने जोडले गेले आणि जात आहेत. यात शिंपडून पवित्र झालेले अनेक भेटतात…संघ विचाराने न्हाऊन निघालेले भिमराव बडदे आणि बडदे कुटुंबिय क्वचितच असतात…
- सुशांत घोडके, कोपरगांव
भ्रमणभाष : ९४२३१६६१०३
