गोदातीरावर काका कोयटे यांच्या सहकार्याने ‘वैश्विक योग संमेलन’ भरवणार:- परमानंद महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी : एखादी वास्तू सहज तयार होते, पण तिचे संगोपन, संवर्धन करणे ही खूप जिकरीची गोष्ट असते. कोपरगाव तालुक्यात ते सामाजिक काम समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंदिर (योग भवन) लोकार्पण करून कोपरगाव परिसरातील योग गुरु, योग साधक, साधिका यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला आहे. कोपरगाव तालुक्यातील योग गुरूंची पिढ्यान पिढ्यांची परंपरा पाहता काका कोयटे यांच्या सहकार्याने गोदातीरावर ‘वैश्विक योग संमेलन’ भरविण्याचा योग पुन्हा एकदा जुळवून आणता येईल. असे प्रतिपादन आरोग्य मंदिर (योग भवन) लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक परमानंद महाराज यांनी केले.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील साई सिटी भागातील भाग्यनगर येथे उभारलेल्या आरोग्य मंदिर (योग भवन) लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशन अध्यक्ष परमानंद महाराज मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समता चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव शहर हे गोदाकाठावर वसलेले अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. या परिसरात योग साधना करून आरोग्य सुदृढ बनविणाऱ्या अनेक पिढ्या आज ही बहुमोल योगदान देत आहे. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून या परिसरातील आरोग्य मंदिर (योग भवन) सुशोभीकरण व व्यवस्थापनाची जबाबदारी समता चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारली आहे. हा परिसर कोपरगाव शहराचा केंद्रबिंदू होत असून प्रदूषण विरहित परिसर मानला जातो. ही वास्तू योग दिनानिमित्त कोपरगाव परिसरातील योग प्रेमींना अर्पण करत आहोत. कोपरगावकरांना शहरातील अनेक कुटुंबियांनी योग साधनेच्या माध्यमातून सुदृढ शरीर व सकारात्मकता प्राप्त करून दिली आहे.

कोपरगाव परिसरातील योगासनामध्ये शहा कुटुंबातील तीन पिढ्या वर्षानुवर्ष कार्यरत असून शहा कुटुंबातील जेष्ठ योग प्रशिक्षक उत्तम भाई शहा यांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच कोपरगाव परिसरातील योग साधक व साधिकांना योगासनाच्या माध्यमातून अविरतपणे मार्गदर्श करणाऱ्या विमल पुंडे यांना ‘योग सम्राज्ञी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
तसेच कोपरगाव परिसरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अभिजीत शहा, नितीन झंवर, दत्ता पुंडे, संतोष नलगे, अर्जुनराव दुबे, सौ. शशिकला लकारे, नानासाहेब गव्हाळे, सौरभ पुंडे, सौ शिल्पा पुंडे, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे आणि हास्य सम्राट चंदूलाल बजाज, हास्य सम्राज्ञी योजना पोतदार आजींचा देखील जागतिक योग दिनानिमित्त समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ठोळे परिवाराच्यावतीने उद्योगपती राजेश ठोळे यांनी सत्कार स्वीकारला.

प्रसंगी प्रशांत सदाशिव लोखंडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६ ठिकाणी १ कोटी रुपयांचे योग भवन मंजूर करून त्यांचे बांधकाम करण्यात आले होते. बांधण्यात आलेल्या वेगवेगळ्या वास्तूंचे संवर्धन व संगोपन करणे महत्त्वाचे असते. एखाद्या बांधलेल्या वास्तूचे संवर्धन व संगोपन क्षमता परिवाराचे संस्थापक काका कोयटेच करू शकतात. त्यामुळे माजी खासदारांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याचा प्रत्यय आज आपल्या सगळ्यांना येत आहे.

तसेच योग सम्राज्ञी पुरस्कार प्राप्त विमल पुंडे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कोपरगाव परिसरातील योग प्रशिक्षकांना काका कोयटे यांनी जागतिक योग दिनानिमित्त आमचा सन्मान करून आम्हाला सन्मान मिळवून दिला. योग साधनेच्या माध्यमातून कोपरगावकरांना मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवत आहोत. योगासनांमुळे नव संजीवनी मिळते. हा पुरस्कार माझा नसून कोपरगाव परिसरातील योग करणाऱ्या महिलांना मिळालेला पुरस्कार आहे.
या वेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे प्रेमानंद गायकवाड महाराज, निजानंद महाराज, सार्थक आनंद महाराज, प्रेमानंद महाराज, प्रशांत सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, तालुका प्रमुख रावसाहेब थोरात, महिला तालुका प्रमुख सौ.मीनाक्षी वाकचौरे, शहर प्रमुख अक्षय जाधव, डॉ.विलास आचारी, डॉ.दत्तात्रय मुळे, डॉ.रमेश कोठारी, जेष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, शिवसेना कार्यकर्ते अभिजीत आव्हाड, सुनील साळुंखे, महिला आघाडी शहर प्रमुख विजया थोट, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघ संचालक महावीर सोनी, आशुतोष पटवर्धन समता महिला बचत गट अध्यक्ष सौ.सुहासिनी कोयटे आदींसह कोपरगाव परिसरातील योग प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचेआभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *